केंदूर – पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांचा ऊस वाहतूक करणारा ट्रक चालक ट्रकमधून ऊस काढून परस्पर रसवंती गृहाला विकत असल्याची बाब एका व्हिडीओ मधून समोर आली आहे. त्यामुळे पिंपळे जगताप, करंदी, वाजेवाडी भागातील शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक ट्रक चालक आणि कारखाना प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील बाजीराव सोंडेकर यांच्या ऊसाची तोडणी सुरू आहे. या शेतकऱ्याचा ऊस (एम एच १२ ए यु ४४२५) या ट्रकमध्ये भरून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला वाहून नेत असताना ट्रक चालकाने मोहितेवाडी (ता. खेड ) या ठिकाणी एका रसवंती गृहाजवळ रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उभा करून ट्रकमधून ऊस खाली टाकून रसवंती गृहाला हा चालक ऊस विकत असल्याचे एका व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने ट्रक चालकाला याबाबत जाब विचारला असता ट्रक चालकाने अश्लील भाषा वापरून अरेरावी केली. हा सर्व प्रकार त्या व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये व्हिडीओद्वारे कैद केला आणि त्याचा प्रसार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाला. दरम्यान या प्रकाराबाबत अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अगोदरच कोरोनाच्या महामारीत शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. त्यात शेतकऱ्यांची अशा प्रकारे लूट सुरू आहे. त्यामुळे पिंपळे जगताप, करंदी, वाजेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.