धरणाचे पाणी प्रथम जिल्ह्याला मिळावे

खा. उदयनराजे भोसले : सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज

वडूज -सातारा जिल्ह्यातील धरणांचे पाणी प्रथम सातारा जिल्ह्यातील संपूर्ण शिवारात पोहोचले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. वडूज येथील एका मंगल कार्यालयात झालेल्या समान वाटप पाणी परिषद मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, आमदार शशिकांत शिंदे व जयकुमार गोरे, जलसंपदा अधिकारी घोगरे, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते, माजी सभापती संदीप मांडवे, सुनील काटकर, विजय शिंदे, टी. आर. गारळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उदयनराजे म्हणाले, “जिल्ह्यातील लोकांना पाणी मिळाल्यावर इतर जिल्ह्यांना पाणी द्यावे. गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील राजकारण हे पाणी प्रश्‍नावरच केले जात असून आता सगळ्यांनी एकत्र येऊन पाण्यासाठी लढा देणे गरजेचे आहे. हा जिल्हा क्रांतिकारक व चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे जिल्ह्यातील जनतेची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एका ताकदीने लढा दिल्यास या मागणीला नक्कीच यश मिळेल.

राज्यातील अन्य जिल्ह्यांचा विचार केला असता त्या जिल्ह्याच्या वीज, पाणी आदी प्रश्‍न पुढे येतात, त्यावेळी त्या जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे नेतेमंडळी, सर्वसामान्य लोक एकत्र येतात आणि आपली समस्या सोडवून घेतात. या जिल्ह्यातील पाणी दुसऱ्यांनाही मिळावे त्याला आमचा विरोध नाही.

मात्र, या जिल्ह्यातील जनतेचा पाण्यासाठी प्राधान्याने विचार झाला पाहिजे. सातारा जिल्हा अतिशय सहनशील आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शेती, वीज, पाणी आदी समस्यांसाठी आजपर्यंत ठोस भूमिका घेतली नाही, ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यात अनेक नद्या आहेत, मात्र त्यांतील पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने जिल्ह्यातील बहुतांशी भागात शेती पाणी समस्या उद्‌भवली आहे.”

डॉ. पाटणकर म्हणाले, “”खटाव तालुक्‍यातील शेती पाणी समस्येसाठी 2005 मध्ये आवाज उठविला होता. खटाव माणमधील गावे पाण्यापासून वंचित ठेवण्याची गरज नव्हती. दोन्ही तालुक्‍यांतील 75 टक्के गावे पाणी देण्यापासून वगळली आहेत.” तसेच ज्या गावांना पाणी मिळाले आहे, त्या गावांचे क्षेत्र किती व त्यांना पाणी किती मिळते? त्यामुळे पाण्याअभावी तालुक्‍यातील बहुतांशी कुटुंबे उदरनिर्वाहासाठी शहरी भागांत गेली आहेत.

येथील लोकांनी शहरी भागांत जाऊन रोजंदारीचेच काम करायचे का, असा प्रश्‍न त्यांनी केला. आमदार शिंदे, आमदार गोरे यांची भाषणे झाली. यावेळी नगरसेवक शहाजीराजे गोडसे, अतुल पवार, दाऊद मुल्ला, अमीन मुल्ला, मनोज देशमुख तसेच गावोगावचे सरपंच, चेअरमन, पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.