पावणे सात लाखांचे चोरीचे 70 मोबाईल,हस्तगत

गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी

पिंपरी – उघड्या दरवाजावाटे चोरी करणाऱ्या एका चोरट्याकडून तब्बल सहा लाख 72 हजार रुपयांचे महागडे 70 मोबाइल पोलिसांनी हस्तगत केले. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ही कामगिरी केली.

शिवराज बाळासाहेब वाघोले (वय 19, रा. मु पाचाणे, पो. चांदखेड, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट पाचचे सहाय्यक निरीक्षक राम गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीचे मोबाइल विक्री करण्यासाठी एकजण आंबी चौक, तळेगाव या ठिकाणी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी वाघोले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यात 30 मोबाइल आढळून आले. पोलिसांनी त्याला याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने हे मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी वाघोले याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून अधिक चौकशी केली असता त्याने चोरीचे आणखी 40 मोबाइल आपल्या घरी असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन मोबाईल हस्तगत केल. पोलिसांनी आरोपी वाघोले यांच्याकडून एकूण सहा लाख 72 हजार रुपये किमतीचे सत्तर महागडे मोबाईल जप्त केले. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात केवळ बारा गुन्हे दाखल आहेत. उर्वरित मोबाइलच्या मालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. ज्या नागरिकांचे मोबाइल चोरीस गेले आहेत त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन गुन्हे शाखा युनिट पाचने केले आहे.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे उपायुक्त सुधीर हिरेमठ सहाय्यक आयुक राजाराम पाटील, श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक निरीक्षक राम गोमारे, कर्मचारी दयानंद खेडकर, राजकुमार इघारे, फारूक मुल्ला, संदीप ठाकरे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, भरत माने, श्यामसुंदर गुट्टे, गोपाल ब्रम्हांदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.