काबुल : अफगाणिस्तानावर तालिबानने केलेला कब्जा ज्याप्रमाणे जगाला मान्य नाही त्याच प्रमाणे इथल्या स्थानिक नागरिकांनी देखील हे वर्चस्व नाकारल्याचे दिसत आहे. कारण तालिबानचे वर्चस्व झुगारत मागील दोन दिवसांपासून काही भागांत विखुरलेल्या निदर्शकांनी देशाचा राष्ट्रध्वज फडकवत निदर्शने केली.
आपल्या सत्तेला वाढत्या विरोधाचा सामना करणाऱ्या दहशतवाद्यांनी नव्याने हिंसाचार करत निदर्शनांना प्रत्युत्तर दिल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. यापूर्वी अफगाणिस्तानात कठोर शासन लागू केल्यानंतर आता आपण अधिक मवाळ झालो असल्याची आश्वासने तालिबानने दिली होती. मात्र, या आव्हानांच्या पाश्र्वाभूमीवर, दहशतवाद्यांनी कुठल्याही प्रकारचे मतभेद दडपून टाकण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
गुरुवारी देशाच्या स्वातंत्र्यदिनी काबूल विमानतळानजिक मोटारी व लोकांच्या एका मिरवणुकीत अफगाणी राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ लांब काळे, लाल व हिरवे फलक लावण्यात आले होते. दहशतवाद्यांचा स्वत:चा झेंडा असल्यामुळे हा फलक त्यांच्याविरुद्धच्या अवज्ञेचे प्रतीक बनत आहे. नंगरहार प्रांतातील ज्या निदर्शनांची दृश्यफीत ऑनलाइन पोस्ट करण्यात आली, त्यात बंदुकीच्या गोळीने जखमी झालेला निदर्शक रक्तबंबाळ झाला असून बघे त्याला बाजूला नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
खोस्त प्रांतात आणखी एक विरोध हिंसकरीत्या मोडून काढल्यानंतर तालिबानी अधिकाऱ्यांनी गुरुवारी २४ तासांची संचारबंदी लागू केली, अशी माहिती येथील परिस्थितीवर विदेशातून लक्ष ठेवून असलेल्या पत्रकारांना मिळाली. प्रत्यक्षदर्शी आणि समाजमाध्यमांवरील व्हिडीओंनुसार, कुनार प्रांतातही निदर्शक रस्त्यांवर उतरले. दरम्यान, अद्यापही तालिबानच्या अमलाखाली न आलेल्या देशातील अखेरच्या भागात एकत्र आलेल्या विरोधी नेत्यांनी नॉर्दर्न अलायन्सच्या झेंड्याखाली सशस्त्र विरोध सुरू करण्याचे सूतोवाच केले.