सोलापूर : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता तर महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले होते. आता सगळ्या पक्षांनी विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीमधील कोणत्या घटक पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच सोलापुरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
अनिल सावंत हे भैरवनाथ शुगर लवंगी येथील साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. अनिल सावंत हे पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर दावा देखील केला होता. मात्र सध्या ही जागा भाजपकडे आहे. या मतदारसंघात भाजपचे समाधान औताडे हे आमदार आहेत.
भविष्यात ही जागा भाजपच्या वाट्याला जाऊ शकते. त्यामुळे अनिल सावंत आणि शरद पवार यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. अनिल सावंत हे आता हाती तुतारी घेऊन पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा लढवण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर मंत्री तानाजी सावंत आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असणार आहे.