वुहान : जगभरात कोरोना सर्वत्र पसरत असतानाच चीनच्या वुहानमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. वुहानमध्ये मागच्या पाच दिवसात कोरोना विषाणूचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. परंतु, विदेशातून आलेले ३९ आणखी लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोरोना विषाणूमुळे चीनमधील वुहानमध्ये कडक पावले उचलली गेली होती. वुहानमध्ये सुमारे ५६ मिलियन लोकांना घरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे कोरोना विषाणूने संक्रमित लोकांमध्ये घसरण झाल्याचे सांगण्यात येते. तर याच महिन्याच्या सुरुवातीला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही वुहानचा दौरा केला होता आणि आरोग्य सेवेचा आढावा घेतला होता.
बीजिंगला येणाऱ्या सर्व विमानांना दुसऱ्या शहरात वळवण्यात येत आहे. तिथे प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जाईल, असे चीनच्या विमान सेवेशी निगडित एका अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. चीनमध्ये कोरोना विषाणूनचे आतापर्यंत ८१ हजाराहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. त्याचबरोबर ३२७० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.