बदलापूर – बदलापुरातील एका व्याक्तीने त्यांच्या बंगल्याचं नाव ‘शेअर मार्केटची कृपा’ असे ठेवले आहे. या घराची आणि नावाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. मुकुंद खानोरे असे बंगला मालकाचे नाव असून शेअर मार्केटमुळे आर्थिक भरभराट झाली. ज्या क्षेत्रात आपण काम करतोय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या बंगल्याला शेअर मार्केटची कृपा नाव दिल्याचे त्यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.
मुकुंद खानोरे हे मूळचे बदलापूरचे आहेत. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यांना यश मिळत गेलं आणि त्यांनी शेअर मार्केटमध्ये जम बसवून चांगले नाव कमावले. खानोरे यांना शेअर मार्केट क्षेत्रातील एक तज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. खानोरे यांनी शेअर मार्केटमध्ये नाव कमावल्यानंतर त्यांनी बदलापुरातील कासगावमध्ये मोठी जागा विकत घेतली. याच जागेत त्यांनी बंगला बांधला आहे. याच बंगल्याला शेअर मार्केटची कृपा नाव देण्यात आले आहे.