विविधा: खरंच पत्र लिहायला पाहिजे

अश्‍विनी महामुनी

नेहमीप्रमाणे मी शाळेतून आल्यावर घरात शिरण्यापूर्वी दारातील लेटर बॉक्‍सवर एक नजर टाकली. ही माझी रोजची सवय. खरं तर हल्लीच्या मोबाईलच्या जमान्यात पत्रे येणे हा प्रकार संपल्यातच जमा आहे. (कधीकाळी कौतुकाचा असलेला टेलिफोनही मोडीत निघाल्यातच झाला आहे.) कॉल, व्हॉईस कॉल, व्हॉट्‌स ऍप, मेसेंजर, फेसबुक इत्यादीमध्ये पत्राला जागा राहिली आहे कोठे? उगाच नियम म्हणून लेटर बॉक्‍स लावलेली आहे. सवयीने त्याकडे पाहणे होते. आणि नित्याचे लेटर बॉक्‍सचे रिकामेपण पाहून घरात जाणे होते. महिन्यातून एकदा येणारे लाईट बिल, एलआयसीच्या पावत्या याशिवाय फारसे काही त्यात येत नाही आणि पोस्टमनला पाहूनही कितीतरी महिने झाले आहेत.

पूर्वी, म्हणजे फार पूर्वी, वाडा जमान्यात, खाकी ड्रेस घातलेल्या, डोक्‍यावर खाकीच टोपी असलेल्या आणि खांद्याला खाकी बॅग, हातात पत्रांचा गट्ठा असलेल्या पोस्टमनची आवर्जून वाट पाहिली जायची. (मला आठवते, एक पोस्टमन कानावर पेन लावून यायचा. मनीऑर्डर वा रजिस्टर पत्र असे काही असले, की कानावरचे पेन काढायचा आणि ज्याला मनीऑर्डर वा रजिस्टर पत्र द्यायचे आहे, त्याची सही घ्यायचा.) त्याची दररोज वाड्यात फेरी असायची आणि पत्र आलेल्यांची नावे मोठ्याने उच्चारत तो पत्र देऊन जायचा. तेव्हा नातेवाईक, मैत्रिणी यांची पत्रे नेहमी यायची..आणि पोस्टमन आला की त्याच्याभोवती घोळका जमायचा, आपले पत्र आले आहे का हे बघायला. आणि कोणाची मनीऑर्डर वगैरे आली, की पाहायलच नको. खुशीची मोठी लहर पसरायची.

हे सारे आठवायचे कारण म्हणजे आज आमच्या लेटर बॉक्‍समध्ये चक्क एक पत्र दिसत होते. मोठ्या उत्सुकतेने मी लेटर बॉक्‍स उघडून आतले पत्र बाहेर काढले. ते एक पाकीट होते. त्यावर अगदी मोत्यासारखे म्हणतात, तशा अक्षरात माझे नाव व पत्ता लिहिलेला होता. पाकीट उलट करून मागची बाजू पाहिली. पाठवणाराचे नाव होते, मीनाझ. फक्त मीनाझ! बाकी काहीही नाही.

मीनाझ ही माझी वर्गमैत्रीण. केजी ते बारावी अशी चौदा वर्षे आम्ही एका शाळेत एका वर्गात शिकलो. त्यातील बहुतेक वर्षे एका बेंचवर बसलो. तिची आणि माझी अगदी जिवलग म्हणावी अशी मैत्री. खरं तर त्यापेक्षाही जवळीक. एकमेकींच्या घरी जाणेयेणे असायचे. माझे वडील आणि तिचे वडीलही चांगले मित्र होते. त्यामुळे अगदी जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती मुंबईला गेली.

आता मीनाझची आणि माझी भेट होऊनही पाच-सहा वर्षे झालीत. मोबाइलवर अधून-मधून बोलणे होते. पण दोघीही आपापल्या संसारात रमून गेल्या आहोत. एकमेकींकडे जायची इच्छा असूनही पूर्वीसारखे जाणे होत नाही. आता कधी मोबाइलवर बोलणे होते, कधी व्हिडियो कॉल केला तर आम्ही एकमेकींना, आमच्या मुलांना बघतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. व्हिडियो कॉल लावला की चांगले अर्धा अर्धा तास बोलणे होते. त्यात सारे घर, घरातील गमतीजमतीही दाखवून होतात. माझा मुलगा तिला आणि तिचा मुलगा मला मावशीच म्हणतो मीनाझ हे नाव वाचूनच मनात अशा अनेक आठवणींनी फेर धरला.

आज हिने पत्र कसे काय पाठवले, असा विचार करत पत्र हातात घेऊनच मी घरात शिरले. हातातील पर्स टेबलावर ठेवली आणि हलक्‍या हाताने हातातील काहीसे वजनदार पाकीट उघडले. आतील कागद बाहेर काढले.
मीनाझने चांगले पाच-सहा पानांचे पत्र लिहिले होते.

खुर्चीत बसून मी प्रथम तिच्या सुंदर अक्षरातील ते पत्र घाईघाईने अधाशासारखे पूर्ण वाचले आणि मग पुन्हा एकदा शांतपणे प्रत्येक शब्द वाचला. तिने अगदी मनापासून लिहिले होते. अनेक आठवणी लिहिल्या होत्या. त्यात शाळेतील पहिल्या दिवसाच्या आठवणी होत्या आणि सेंड ऑफचीही आठवण होती. सेंड ऑफला बहुतेक साऱ्याच कशा नाकाचा शेंडा लाल होईपर्यंत मुसमुसून रडल्या होत्या ते तिने लिहिले होते. शेवटी पत्राचे उत्तर जरूर जरूर देणे असे ठळक अक्षरात लिहिले होते.

पत्र वाचून मी टेबलावर ठेवले. रात्री पुन्हा एकदा वाचण्यासाठी. मनात आले, खरंच पत्र वाचण्यात जो आनंद आहे, तो मोबाइलवर बोलण्यात नाही. अनेकदा बोलणे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे या नात्याने या कानात शिरलेले त्या कानातून बाहेर पडते.

पत्र मात्र हृदयाला भिडते. पत्रातील मजकूर वाचताना डोळ्यापुढे चित्रे उभी राहतात. त्या आठवणी जाग्या होतात. तो अनुभव मोबाइलवर बोलण्यात नाही. त्यात अनेकदा कृत्रिमता, हातराखलेपणा येतो. माझ्या मनात आले, नव्हे, नी निश्‍चय केला खरंच पत्र लिहायलाच पाहिजे…

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)