उणिवांची जाणीव : नको ते हवंय

 प्रा. शैलेश कुलकर्णी

आठवणी म्हणजे आनंदाचे कंद. ह्या आठवणी कधी हर्षाच्या तर कधी स्पर्शाच्या, कधी यशाच्या तर कधी प्रगतीच्या, कधी न्यायाच्या तर कधी विजयाच्या, कधी सुखाच्या तर कधी समाधानाच्या; एकूणच आनंदाची जमापुंजी म्हणजेच आठवणी होय. आठवणींमध्ये दु:ख, द्वेष, राग, नुकसान, अपमान अशा अनेक नकारात्मक घटनांचा देखील समावेश असतोच, पण एकदा का आपण सकारात्मक बाबींचा विचार करायचा ठरवला, की केवळ आनंदाच्या आठवणीशीच आपला संबंध येतो.

आठवणीमध्ये रमणे हे स्वाभाविक असते, आपलं मन मात्र ते मान्य करायला तयार होतंच असं नाही. अनेकदा आपलं गाफील राहणं किती तापदायक, त्रासदायक, काही वेळा तर घातकही कसं ठरू शकतं, ह्याची जाणीव करून घेणं अत्यंत जरुरीचं असतं. एकाच घरात कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रत्येक पातळीवर विविधता दिसून येत असते. मानसिक, शारीरिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, भावनिक अशा अनेक बाबतीत एकाच कुटुंबातील प्रत्येक सदस्य स्वतंत्र विचार, वर्तन आणि व्यवहार करत असल्याचं आपल्याला सर्वत्र दिसत असतं. व्यक्ती तितक्‍या प्रकृती असं आपण नेहमीच म्हणतो, अनुभवतो देखील. एकाच घरात जे एखाद्याला हवंय ते कदाचित दुसऱ्याला मात्र नको असतं.

अगदी दूरदर्शनवरील एखाद्या वाहिनीवरील एखादी मालिका एखाद्याला बघायची असते, तर दुसऱ्याला बातमीपत्रांच्या वाहिन्यांमध्ये अधिक रस असतो. अशावेळी संवादाची सुरुवातच वादानं होऊ लागते. जसं घरांत, तसंच अनेकदा बाहेरही घडत असतं. काही वेळा आपल्याला त्याची जाणीव होत नाही, तर अनेकदा आपण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतो.

बालहट्ट
लहान वयात मानसिक परिपक्वता कमी असते. अनेक बाबतीत समज, उमज देखील कमीच असते; अर्थात ही उणीव निश्‍चितच नाही; परंतु त्या कारणानं चांगलं-वाईट, खरं-खोटं, आपलं-परकं, फायदा-तोटा अशा अनेक बाबींचं आकलन त्वरित होत नाही. अनेकदा वाईटच चांगलं वाटत असतं. म्हणजेच जे नकोय तेच हवं असतं. लहान मुलांमध्ये असं चित्र दिसून येणं स्वाभाविकच असतं, पण काही प्रमाणांत हे मोठ्यांच्या बाबतीत देखील जेव्हा दिसतं, तेव्हा मात्र बालहट्ट केल्यासारखं वागणं ही त्यांच्यातील उणीव असते एवढं निश्‍चित. आश्‍चर्याची बाब अशी की, त्याची अनेकांना जाणीवही होत नाही. मोठ्यांच्या बालहट्टाचा परिणाम देखील अनेक बाबतीत होतो, अनेकांना त्याचा मानसिक त्रासही होतो. ह्याची जाणीव वेळीच होणं जरुरीचं असतं. ह्या हट्टामध्ये समाविष्ट केली जाणारी अथवा अनवधानामुळे संबंधित आर्थिक बाब ही अनेकांची डोकेदुखी ठरते. अलीकडच्या काळात साजरे केले जाणारे आप्तेष्टांचे, मित्रमंडळींचे वाढदिवस आणि त्यासाठी मुलांकडून होणारा हट्ट हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. वाढदिवस पूर्वी देखील साजरे होत असत, परंतु त्यांचं स्वरूप अतिशय निराळं होतं. अनेकदा ते आपापल्यापरीनं घरांतच साजरे होत असत. अलीकडच्या काळांतील वाढदिवस आदल्या दिवशी रात्री बारा वाजल्यापासूनच साजरे व्हायला लागतात. त्या उत्साहात आणि आनंदातिरेकानं इतरांना होणाऱ्या त्रासाचा का बरं विचार होऊ शकत नाही? ह्याची जाणीव घरच्यांकडून अशांना का करून दिली जात नाही? घरच्यांनाच त्याची जाणीव नसणं हीच उणीव म्हणावी लागेल.

मोबाइलच्या आवाजाची पातळी
पूर्वी एखाद्याच्याच घरांत टेलिफोन असायचा, त्याचा वापरही मर्यादित होत असे. घरातील शांतता टिकवण्यासाठी टेलिफोनवरील संभाषण देखील आवाजाच्या खालच्याच पातळीत होत असे. अलीकडच्या काळात त्या टेलिफोनची जागा मोबाइलनं घेतली. अर्थातच, तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून खूपच मोठी क्रांती झाली, पण ह्या क्रांतीमुळे मन:शांती मात्र ढळली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पूर्वी घरटी एक टेलिफोन होता, आता माणशी एक मोबाइल आहे. ह्यालाही अपवाद आहेच, कारण काहीजणांकडे दोनतीन मोबाइल्स असल्याचं दिसून येतं. त्यातही मोबाइलवर मोठमोठ्या आवाजात बोलणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. काहीजण मोबाइलचा स्पीकर मोठ्या आवाजांत ठेवून सतत आणि सलग अनेक वेळेपर्यंत बोलत असतात. प्रत्येकाच्या मोबाइलचे निरनिराळे रिंगटोन्स आणि त्याच्या आवाजाची पातळी ह्याचा कोणताही विचार न करता सर्रास त्याचा सर्वत्र वापर केला जात असल्याचं आपल्याला नेहमीच दिसून येत असतं. ह्याच मोबाइलचा वापर इंटरनेटच्या साह्यानं यूट्यूब चॅनल्स, गाणी, एफ एम रेडिओ, लाइव्ह टी व्ही पाहण्यासाठी अनेकांकडून सर्रास होत असल्याचं आपण पाहतो. एकूणच ह्या सर्व वापरांत होणाऱ्या आवाजाचा आणि आवाजाच्या पातळीचा कोण आणि किती विचार करतो? अशा प्रकारचा होणारा वापर हा कोणत्या ठिकाणी होत आहे ह्याचीही अनेकदा वापरकर्त्याला जाणीव होत नाही.

शाळा, कॉलेजमध्ये, हॉस्पिटलमध्ये, वर्दळीच्या ठिकाणी, बॅंकेत, सरकारी कार्यालयांत, धर्मस्थळांमध्ये जिथे शांततेची जरुरी असते, अशाही अनेक ठिकाणी ह्या मोबाइलच्या वापराचा आणि त्याच्या विविध प्रकारच्या आवाजाच्या पातळीचा इतरांना किती त्रास होत असतो, ह्याची साधी जाणीवही होत नसते. हे त्या ठिकाणी येणाऱ्यांच्याच बाबतीत घडतं असं नाही, तर त्या ठिकाणी काम करणारे देखील सर्रास मोबाइलच्या वापराचा आणि त्याच्या आवाजाच्या पातळीचा उच्चांक गाठून उद्रेक करत असतात. मोबाइलचा गरजेपेक्षा अतिरिक्त वापर ही बाब किमान त्या व्यक्तीपुरतीच संबंधित आणि विपरीत परिणाम करणारी ठरू शकते; परंतु सभोवताली असणाऱ्या, वावरणाऱ्या सर्वांना त्याचा त्रास होत असल्याचं न कळणे ही मात्र उणीवच असते. त्यांतही वापरकर्ता स्वमग्नतेमुळे कशाचंही भान राखू शकत नाही, ही खेदाची आणि दुर्दैवाची बाब आहे. एकूणच जे नकोय तेच हवंय.

स्पीकर्सच्या भिंती
कार्यक्रम कोणताही असोत, स्पीकर्सच्या भिंती आणि कर्णकर्कश आवाज हा पाहिजेच. काही वेळा तर हेच कळत नाही की, कार्यक्रमासाठी ह्या स्पीकर्सच्या भिंती उभ्या केल्या जातात की, स्पीकर्सच्या भिंतीसाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. सत्यनारायणाची पूजा असेल, लग्न समारंभ असेल, मिरवणूक अथवा वरात असेल, कोणताही धार्मिक उत्सव अथवा जयंतीनिमित्तचा एखादा कार्यक्रम असेल; स्पीकर्सच्या भिंती उभ्या केल्याशिवाय आणि आवाजाची पातळी ओलांडल्याशिवाय कार्यक्रम झाल्यासारखाच वाटत नाही अशा अविर्भावात असणाऱ्यांच्या कोणत्या जणिवा शिल्लक राहिलेल्या असतात, हाच कळीचा मुद्दा आहे. त्यातही त्यावर वाजवली जाणारी गाणी आणि एकूणच त्यांचं संगीत हा तर निराळाच विषय आहे. स्पीकर्सच्या भिंतीतून निघणारा कर्णकर्कश आवाज मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अपायकारक असल्याचं अनेकदा माननीय न्यायालयानं देखील बजावल्याचं आपल्या प्रत्येकाला ज्ञात आहेच. अर्थात हे सर्व लोकांकडून मिळवलेल्या वर्गणीतून केलं जातं तेव्हा तर तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करण्याशिवाय गत्यंतर नसतं. अशांतता पसरवणाऱ्या ह्या स्पीकर्सच्या भिंतीचा स्वीकार आणि अंगीकार करणाऱ्यांच्या उणिवा त्यांना दाखवून देणं म्हणजे मांजरीच्या गळ्यांत घंटा बांधण्यासारखंच असतं. ह्याचे एकूणच होणारे दुष्परिणाम समजून घ्यायच्या मन:स्थितीत अशा वेळेस असणारे किती जण असल्याचं दिसतं. सभोवतालच्या परिसरांतील प्रत्येकालाच जे नकोय तेच ह्यांना हवंय.

फटाकेबाजी आणि घोषणाबाजी
फटाकेबाजी आणि घोषणाबाजी करणाऱ्या कोणालाही काळवेळेची जाणीव होत नाही, त्याचं भान राहात नाही. एक प्रकारे शक्तीचं आणि पैशाचं प्रदर्शन करणारे फटाकेबाजी आणि घोषणाबाजी हे दोन्हीही स्वतःसाठी, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, प्रसिद्धीसाठी आणि स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी करत असल्याचं अगदी सर्वसाधारण व्यक्तीला देखील दिसत आणि कळत असतं. निवडणुका जवळ आल्या की, ह्याचा प्रत्यय आपल्याला येऊ लागतो. नेत्यांच्या स्वागतासाठी फटाक्‍यांची आतषबाजी आणि नेते आल्यावर त्यांची स्पीकर्सवरून मोठ्या आवाजातील घोषणाबाजी सुरू होते. त्यांना आचारसंहिता नाही, तर त्यांची स्वतःची प्रचारसंहिता महत्त्वाची वाटत असते. अगदी माननीय न्यायालयाच्या आदेशाचं आणि सन्मानाचं फारसं सोयरसुतक ह्या नेत्यांना असतंच असं नाही. तशी जाणीवही न होणं हीच खरं तर उणीव म्हणावी लागेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असूनही ह्याबाबतीत कोणीही अवाक शब्द काढू शकत नाही; अगदीच एखाद्यानं काढलाच तर ह्या नेतेमंडळींसाठी तो त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय बनून जातो. आनंदोत्सव साजरा करणं निश्‍चितच गैर नाही परंतु काळवेळ विचारांत घेणं, जनजीवन विस्कळीत न होऊ देणं तितकंच महत्त्वाचं असतं. फटाकेबाजी आणि घोषणाबाजी करताना रस्ते अडवले जातात, त्याचा पादचारी आणि वाहनचालकांना खूपच त्रास होत असतो, हे देखील विचारांत का बरं घेतलं जात नाही? एकूणच लोकांना जे नकोय तेच ह्यांना हवंय.

वाहत्या वाहतुकीचा अभाव
वाढत चाललेली लोकसंख्या, त्यांच्या गरजांची पूर्तता, पायाभूत सुविधांवर त्यानुषंगाने आलेला ताण, बदलती जीवनशैली ह्या सर्वाचाच परिणाम नागरीकरण आणि शहरीकरणावर कमी अधिक प्रमाणात सर्वच बाबतीत होत असल्याचं अनेक ठिकाणी दिसून येतं. ही खरं तर खूप मोठी नागरी समस्या आहे, ह्या समस्येचा अत्यंत गांभीर्यानं, प्राधान्यानं अभ्यासपूर्वक विचार केला पाहिजे. अलीकडच्या काळात सर्वत्र वाहत्या वाहतुकीचा अभाव असल्याचं दिसून येत आहे. स्वायत्त वाहतूक व्यवस्था हे वाहतुकीच्या समस्येचं मूळ कारण असल्याचं न समजणे हीच उणीव म्हणावी लागेल. नागरी वाहतूक व्यवस्थेचा वापर ज्या ठिकाणी योग्य तऱ्हेने होत असतो, त्या ठिकाणी खासगी स्वयंचलित वाहने रस्त्यावर कमी येतात, परिणामी हवेचं, ध्वनीचं प्रदूषण नियंत्रित ठेवता येतं. रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली, की कर्णकर्कश हॉर्न आणि तेही गरजेशिवाय वाजवले जातात, वाहन जलदगतीनं चालवण्यामुळे होणारं ध्वनी प्रदूषण, अनेकदा अकारण, विशेषतः टू व्हीलर्स इकडून-तिकडून मोठमोठ्याने हॉर्न वाजवत फिरवल्या जातात. ह्याचा इतरांना त्रास होऊ शकतो ही जाणीव का बरं होत नाही ? वाहतूक जेव्हा वाहती असते तेव्हा अनेकदा अशा समस्या उद्‌भवतच नाहीत. “नकोय तेच हवंय” हेच मुळांत चुकीचं आहे हे समजलं पाहिजे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.