भोपाळ: देशात अशा काही घटना घडत त्यातून वेळोवेळी पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन होत असते. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका पोलिसाने धरणामध्ये बुडणाऱ्या मुलाचा जीव वाचवला आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या दतिया येथील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दतिया चिरुला येथील रहिवासी असलेला अकरा वर्षांचा हेमंत अंगूरी नदीच्या किनाऱ्यावर बकरी चारण्यासाठी घेऊन गेला होता. मात्र, पाय घसरल्याने हेमंत अंगूरी नदीच्या धरणात कोसळला. हेमंत बुडू लागलेला असतानाच शेजारी असणाऱ्या काही लोकांची नजर या मुलाकडे गेली. यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या चिरुला ठाण्याचे प्रभारी गिरीश शर्मा पाच मिनिटाच्या आतच पोलिसांच्या टीमसोबत या धरणाकडे निघाले.
घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावरच रेल्वे फाटक आहे, ते संध्याकाळी बंद झाल्यावर किमान 20 ते 25 मिनिटं उघडत नाही. गिरीश शर्मा पोहोचले तेव्हा हे फाटक बंद होते. यानंतर त्यांनी गाडी फाटकाच्या दुसऱ्या बाजूलाच सोडली आणि आपल्या सहकाऱ्यांना घेऊन ते धरणाकडे पोहोचले.
इकडे डॅममध्ये हेमंत स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात होता, मात्र तो बुडू लागला होता. घटनास्थळी उपस्थित असलेले काही लोक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. गिरीश शर्मा यांनी पोलिसांच्या मदतीने त्या मुलाला बाहेर काढले. यादरम्यान हेमंतला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्याच्या नाकात आणि तोंडात पाणी गेले होते.
गिरीश शर्मा यांनी या मुलाला उचलून घेतले आणि त्याला लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी धाव घेतली. यादरम्यान रेल्वे फाटकही आले मात्र ते अजूनही बंदच होते. अशात गिरीश शर्मा यांनी याच परिस्थितीत ट्रॅक पार केला आणि या मुलाला रुग्णालयात पोहोचवले.
डॉक्टरांनी लगेचच या मुलावर उपचार सुरू केले. मुलाची अवस्था पाहून डॉक्टरांनी म्हटले, की पाच मिनिटंही उशीर झाला असता, तर हेमंतचा जीव वाचवणं शक्य झाले नसते. काही लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे.