निवडणूक प्रक्रियेतील खरे ‘न्यूटन’!

– दत्तात्रय आंबुलकर 

एक वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या “न्यूटन’ या हिंदी चित्रपटात एका युवा प्रशासनिक अधिकाऱ्याने गहन जंगल व नक्षलवाद्यांच्या धमक्‍या संकटांना तोंड देत व प्रसंगी जीवावर उदार होत निवडणूक अधिकारी म्हणून एकीकडे स्थानिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करीत त्याचवेळी सुरळीतपणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्याचे फिल्मी पण वस्तुनिष्ठ साहस अनेकांच्या पसंतीस पडले होते.

नुकत्याच झालेल्या छत्तीसगड विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान नव्या व बदलत्या संदर्भात बऱ्याच युवा अधिकाऱ्यांनी राज्यातील नक्षलप्रभावित भागात निवडणूक प्रक्रिया निर्धारित स्वरूपात घडवून आणतानाच नक्षल्यांचा आव्हानावर मात करत अधिकाधिक संख्येत मतदान घडवून आणण्याची किमया यशस्वीपणे साधली त्याचीच ही सत्यकथा-

छत्तीसगडच्या नक्षली भागातील एका ग्रामीण शाळेचे मुख्याध्यापक असणाऱ्या सत्यनारायण देवांगण यांना त्यांच्या निर्धारित मतदान केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी म्हणून पोहोचण्यासाठी वाहतुकीचा रस्ता सोडून घनदाट जंगलातून सुमारे 4 किलोमीटर पायी जावे लागले. त्यांच्या पायी प्रवासात त्यांची सुमारे 200 पोलीस शिपायांशी गाठ पडली. यावरून त्या भागातील परिस्थितीची कल्पना सहजपणे येऊ शकते.

रात्रभर न झोपता पोलीस संरक्षणात मतदान केंद्रावर पोहोचून आपले निर्धारित कर्तव्य बजावणाऱ्या सत्यनारायण देवांगण यांना त्यांच्या काम आणि कामगिरी या दोघांचे पण मोठे समाधान लाभले. या मतदान केंद्रावर यावेळी 306 म्हणजेच 43 % मतदारांनी नक्षल्यांच्या धमक्‍यांना न जुमानता मतदान केले. इतर ठिकाणच्या मतदानाच्या टक्‍केवारीच्या संदर्भात यावेळच्या मतदानाची टक्‍केवारी अल्प वाटत असली तरी 2013 मध्ये छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्यावेळी या केंद्रावरील मतदानाची टक्‍केवारी केवळ 3% होती. एवढे सांगितले म्हणजे 3 ते 43 टक्‍के या नक्षलवादी क्षेत्रातील मतदानाच्या वाढीव टक्‍केवारीचे महत्त्व तर अनेक पटींनी वाढते.

नक्षलप्रभावित दंतेवाडा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर आपले निवडणूक कर्तव्य बजावण्यासाठी लिंगाराम मरकाम व त्याच्या तीन सहकाऱ्यांना 15 किलोमीटर पायी जावे लागले. त्या केंद्रावर ही मंडळी दिवसभर थांबल्यावर केवळ 6 जणांनी मतदान केले. गेल्या निवडणुकीत या केंद्रावर कुणीही मतदान केले नव्हते. हा प्रकार यावेळी निकाली निघाला. मुख्य म्हणजे मतदान केल्यास गंभीर परिणाम होतील या नक्षली धमक्‍यांना न जुमानता ही मंडळी एका नावेने व आडवाटेने मतदानासाठी प्रथमच आले होते हे विशेष.

छत्तीसगडच्या दंतेवाडा या सर्वाधिकदृष्ट्या नक्षल प्रभावित अनेक मतदान केंद्रात 2013 च्या विधानसभा निवडणूक मतदानाची टक्केवारी शून्य होती तर यावेळी त्याच दंतेवाडा जिल्ह्यात 60% असे विक्रमी मतदान झाले. मुख्य म्हणजे निवडणूक प्रचार काळात नक्षल्यांचे हल्ले आणि कारवाया मोठ्या प्रमाणात सुरूच असतानाही त्यांच्या धमक्‍यांना न घाबरता यावेळी प्रथमच व फार मोठ्या प्रमाणात मतदान झाले ही बाब नक्षल्यांना स्थानिक वनवासींनी दिलेले रोखठोक उत्तर असून हे होण्यामध्ये अनेक “न्यूटन’ म्हणजेच प्रामाणिक व जिद्दी निवडणूक कर्मचाऱ्यांचे मोठे व अभिनंदनीय योगदान अर्थातच महत्त्वाचे ठरले अहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)