माद्रिद :- स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत रेयाल माद्रिदने विजयाचे सातत्य राखताना ग्रेनाडाचा 2-1 असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर त्यांनी स्पर्धेत अग्रस्थान मिळवले असून त्यांचा संघ विजेतेपदाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
करोनाचा धोका कमी झाल्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या या स्पर्धेत हा त्यांना सलग 9 वा विजय आहे. सरस व आक्रमक खेळात त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांनी बार्सिलोनाला पिछाडीवर टाकताना गुणतालिकेत 83 गुणांची नोंद केली. बार्सिलोनाचे 79 गुण झाले आहेत. मात्र, त्यांचे सर्व सामने संपल्याने रेयाललाच विजेतेपद मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
ग्रेनाडाविरुद्धचा सामना सुरू झाल्यावर फेरलॅंड मेंडीने 10 व्या तर रहिम बेन्झेमाने 16 व्या मिनिटाला गोल केले व संघाला पहिल्या हाफमध्ये 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. दुसरा हाफ सुरू झाल्यानंतर मात्र, त्यांचा खेळ थोडा संथ झाला व त्याचा लाभ घेत ग्रेनाडाच्या डार्विन माशीसने 50 व्या मिनिटाला गोल केला. अर्थात या गोलनंतर त्यांना माद्रिदचा बचाव पुन्हा भेदता आला नाही व त्यांना सामना गमवावा लागला.
माद्रिदला 2017 सालानंतर या स्पर्धेचे विजेतेपद मिळण्याची संधी आहे. आता उर्वरित सामन्यांत माद्रिदने दोन्ही सामन्यात बरोबरी केली तरीही बार्सिलोनाला मागे टाकून त्यांचे विजेतेपद निश्चित होणार आहे.