माद्रिद – युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत रेयाल माद्रीदने मॅंचेस्टर सिटीवर 6-5 असा विजय प्राप्त करताना तब्बल 17 व्या वेळी अंतिम फेरी गाठली.
या दोन संघातील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात मॅंचेस्टरकडून रियाद महारेझने 73 व्या मिनिटाला गोल केला व आघाडी मिळवून दिली. 90 व्या मिनिटाला तसेच अतिरीक्त भरपाई वेळेत रॉड्रिगोने गोल करत रेयालला या सामन्यात 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. तसेच एकूण लढतीत 5-5 अशी बरोबरी झाल्याने 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ खेळवण्यात आला.
यात करीम बेन्झेमाने मिळालेल्या पेनल्टीचा पुरेपुर लाभ घेत 95 व्या मिनिटाला गोल करत रेयालला दुसऱ्या टप्प्यातील सामना 3-1 असा, तर एकूण लढत 6-5 अशी जिंकून दिला.
आता अंतिम सामन्यात रेयाल माद्रिदसमोर लिव्हरपूलचे आव्हान असून हा सामना येत्या 28 मे रोजी पॅरिस येथे खेळवला जाणार आहे. 2018 सालच्या अंतिम सामन्यात रेयालने 3-1 असा विजय प्राप्त करत विक्रमी 13 वे विजेतेपद साकार केले होते.