पावसाळी वातावरणामुळे फराळ फसण्याची भीती
पिंपरी – दिवाळी जवळ आली की, घरा-घरातून भाजणीचा खमंग वास दरवळू लागतो. चकलीच्या भाजणीबरोबरच रवा, बेसन, करंजीचे पुरण तयार करण्यात गृहिणी मग्न होऊन जातात. मात्र, नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर राहणाऱ्या महिलांना मात्र कामाच्या व्यापातून फराळ तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी, त्यांचा कल रेडिमेड फराळ विकत घेण्याकडे वाढत आहे. त्यातच पावसाळी वातावरणामुळे फराळ फसण्याच्या भीतीने महिलांनी यंदा रेडिमेड फराळावर भर दिल्याचे पहायला मिळत आहे.
गेल्या आठवड्यापासूनच रेडिमेड फराळाचे दरपत्रक व्हॉट्स ऍप, फेसबुकवरील ग्रुपवर फिरत आहेत. घरोघरी दरपत्रकेही वाटली जाऊ लागली आहेत. दरवर्षी तयार फराळाची वाढती मागणी लक्षात घेऊन बचतगटाच्या, तसेच घरगुती फराळ बनवणाऱ्या महिलांनीही तयारी सुरू केली आहे. दिवाळीचा फराळ म्हटले की, तो घरच्या चवीचा असावा, असा नोकरदार महिला आणि कुटुंबातील सदस्यांचाही हट्ट असतो. त्यामुळे बाहेर दुकानातून फराळ घेण्यापेक्षा तो गृहउद्योग करणाऱ्यांकडून घेण्याला पसंती दिली जाते.
गेल्या वर्षी जवळपास कित्येक किलो फराळाची मागणी होती. आता चांगली मागणी येण्यास सुरुवात झाली आहे. महिनाभर आधीच दिवाळी फराळ तयार करण्यासाठी सुरुवात करत असतात. लोकांना घरगुती चव हवी असते. दिवाळी जवळ आली की, मागणीचा ओघ वाढतो. अनेकदा मागणी पूर्ण करता येत नाही. जवळपास 60 किलोपर्यंतची ऑर्डर नोकरदार महिलांकडून येत असते, असे बचतगटातील अनेक महिलांनी सांगितले.
गेल्या वर्षी भाजणीची चकली 400 रुपये किलोने उपलब्ध होती. यंदाही त्याच दराने उपलब्ध आहेत. पोह्यांचा चिवडा 225 रुपये ते काजू व इतर सुका मेवा असलेला 370 रुपये किलो, शंकरपाळी 225 ते 350 रुपये किलो, बेसन लाडू 30 रुपये प्रति नग, रवा लाडू 25 रुपये प्रति नग, अनारसे 25 ते 30 रुपये प्रति नग, करंजी 22 ते 30 रुपये प्रति नग, बुंदी लाडू 500 रुपये किलो, मूग लाडू 750 रुपये किलो, रिच आयर्न लाडू 850 रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. याशिवाय 800 ते 1500 रुपयांपर्यंत कॉंबो पॅकही उपलब्ध आहे.
चकली, अनारशाला पसंती
पावसाळी वातावरणामुळे चकली मऊ पडते. त्यातच करताना फसगत झाल्यास चकली कडक होणे किंवा कुस्करणे, असे प्रकार घडत असल्याने नोकरदार महिलांसोबत गृहिणी देखील चकली बाहेरून विकत घेणे पसंत करतात. यामुळे चकलीला जास्त मागणी असल्याचे पाहण्यास मिळते. त्यापाठोपाठ अनारशांनाही पसंती दर्शवली जात आहे. रेडीमेड फराळ सध्या आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध करुन दिला जात आहे. त्यामुळे फराळ भेट देण्यासाठीही रेडीमेड फराळाचे पॅकेटस खरेदी केले जात असल्याचे गृहउद्योग करणाऱ्या महिलांनी सांगितले.