नवी दिल्ली – गेल्या एक ते दोन वर्षांपासून भारतीय संघाला चौथ्याक्रमांकावरील फलंदाजाचा शोध लागला नसून त्यामुळे विश्वचषकातील उपान्त्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच आगामी वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थिती भारतीय संघात जागा मिळालेल्या ऋषभ पंतने आपण चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.
या विषयी बोलताना पंत म्हणाला की, मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. माझ्यासाठी ही गोष्ट नवीन नाहीये, याआधीही मी आयपीएलमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलो आहे. तसेच मी या जागेसाठी सरावही करत आहे. मी कोणत्याही एका शैलीत खेळत नाही, सामन्याची गरज असले तसे खेळण्याचा माझा प्रयत्न असतो.
एकदिवसीय, टी-20 की कसोटी याबद्दल मी फारसा विचार करत नाही. मी कसोटी क्रिकेट आधी खेळल्यामुळे मला याचा थोडा फायदा मिळतो. कसोटी क्रिकेट हा खडतर प्रकार मानला जातो. पण यामुळेच मी डावाला आकार कसा द्यायचा, परिस्थितीनुरुप कसे खेळायचे हे शिकलो. कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन शिकायला मिळते.