कुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी सज्ज : धनोआ

पाकिस्तानकडून भारतीय नेतृत्वाला कमी लेखण्याची नेहमीच चूक : हवाई दल प्रमुख

मुंबई : भारताने अनेकदा पाकिस्तानला धडा शिकवला. तरीही भारतीय नेतृत्वाला कमी लेखण्याची चूक पाकिस्तानने नेहमीच केली, असे परखड भाष्य भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी.एस.धनोआ यांनी शुक्रवारी केले.

येथे एका कार्यक्रमात बोलताना धनोआ यांनी पाकिस्तानबरोबरच्या कुठल्याही प्रकारच्या संघर्षासाठी भारतीय सुरक्षा दले सज्ज असल्याची ग्वाही दिली. भारताच्या राजकीय नेतृत्वाबाबत अंदाज बांधण्यात पाकिस्तान नेहमीच कमी पडल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

पाकिस्तानने 1965 च्या युद्धावेळी तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांना त्या देशाने कमी लेखले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दले लाहोरकडे कूच करतील, असे त्या देशाला वाटले नव्हते. कारगिल युद्धावेळीही तो देश असाच चकला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरही तसेच घडले. भारताचे राजकीय नेतृत्व बालाकोटसारख्या कारवाईला परवानगी देईल असे बहुधा पाकिस्तानला वाटले नसावे, असे त्यांनी म्हटले. पुलवामा घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली. त्यावेळी भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. मात्र, त्यांची तातडीने सुटका करण्यात भारताला यश आले. त्याचे श्रेय धनोआ यांनी भारताच्या राजकीय नेतृत्वाला दिले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×