नवी दिल्ली – भारताच्या पुरुष हॉकी संघाचा जागतिक पुरस्कार विजेता गोलकीपर पीआर श्रीजेश याने आपण आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर आत्मविश्वास उंचावला असून पुढील ऑलिम्पिक स्पर्धेतही सरस कामगिरी करण्याचा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 साली होत असून त्यासाठी सरावाबरोबरच तंदुरुस्ती टिकवण्यावरही भर देणार आहे. परदेशात या काळात होत असलेल्या जवळपास सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे.
केवळ सराव शिबिरात सराव करण्यापेक्षा प्रत्यक्ष स्पर्धांमध्येच जास्त चांगला सराव करता येतो. हॉकी इंडियाने आगामी स्पर्धांसाठी मला संघाबाहेर ठेवले नाही तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मी निश्चितच खेळेन, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
केरळच्या या 33 वर्षांच्या श्रीजेशला नुकताच आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कारही देण्यात आला आहे. पुढील काळात विविध स्पर्धा होणार असून ऑलिम्पिक खेळणे हे प्रत्येक खेळाडूप्रमाणे माझेही स्वप्न आहे. टोकियोत स्वप्नपूर्ती झाली असली तरीही पॅरिसमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघाचा भाग होणे माझे स्वप्न आहे, असेही श्रीजेश म्हणाला.