50 वाचक दोन दिवसांत करणार 10 तास वाचन
भिलार: भारताचे माजी राष्ट्रपती भारतरतक् डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी, दि. 15 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. या निमित्त, दि. 12 व 13 ऑक्टोबर दरम्यान, पुस्तकांच्या गावी, भिलार येथे वाचनध्यास या सलग वाचनाच्या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनन्द काटीकर यांनी दिली आहे. “वाचनध्यास’ उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. सुमारे चोखंदळ वाचकांना, आपल्या आवडत्या साहित्यप्रकाराच्या पुस्तकघरात बसून सलग तास वाचनानंद घेण्याची संधी या उपक्रमाद्वारे मिळणार आहे.
वाचन कौशल्यांचा विकास आणि वाचनसंस्कृतीचे संवर्धन या दोन्ही उद्दिष्टांना पूरक अशा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी वाचनाची आवड असणाऱ्या ईच्छुक वाचकांनी पूर्वनोंदणी करणे अत्यावश्यक आहे. सहभागी संख्या मर्यादित असल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार सुमारे 50 सहभागींची नोंदणी केली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे सहभागी वाचकांशी दि. 13 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनाविषयी अनौपचारिक संवादही साधणार आहेत, अशी माहिती डॉ. काटीकर यांनी दिली. नोंदणीकृत वाचकांची निवास व भोजनाची व्यवस्था राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने करण्यात येणार असून सहभागींनी प्रवास खर्च स्वतः करणे अपेक्षित आहे. नोंदणीकृत वाचकांव्यतिरिक्त इतर वाचकही स्वखर्चाने या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.
पुस्तक वाचनाच्या समृद्ध अनुभवासह भिलारवासीयांचे आदरातिथ्य आणि भिलारचे निसर्गसौंदर्य व नीरव शांतता यांचाही अनुभव घेण्याची संधी सहभागींना मिळणार आहे. म्हणूनच पाचगणी, महाबळेश्वर, वाई, सातारा, पुणे परिसरातील वाचक पर्यटकांसह संपूर्ण राज्यातील पुस्तकप्रेमींनी, वाचकांनी या वाचनप्रेरक उपक्रमात आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. काटीकर यांनी केले.