डॉक्‍टरांचा तुटवडा तरीही आयुक्‍तांची बदलीसाठी ‘तत्परता’

अर्ज करताच तात्काळ बदली; मलईदार जागेवर डॉ. गोफणेंची नियुक्ती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. केवळ एका अर्जावर डॉ. लक्ष्मण गोफणे यांची भोसरी रुग्णालयातून पुन्हा प्रभारी आरोग्य कार्यकारी अधिकारी या प्रशासकीय पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वत: आयुक्‍तांच्या स्वाक्षरीने हा बदलीचा आदेश काढल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. “मलई’दार जागेसाठी आयुक्‍तांनी दाखविलेली तत्परता चर्चेचा विषय बनला आहे.

महापालिकेच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. लक्ष्मण गोफणे हे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आरोग्य विभागातील प्रशासकीय पद असलेल्या आरोग्य कार्यकारी अधिकारी या पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता. आरोग्य विभागातील खरेदीमध्ये कार्यकारी अधिकारी या व्यक्तीची महत्त्वाची भूमिका असते.

महापालिका हद्दीमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर डॉ. गोफणे यांची नवीन भोसरी रुग्णालयात बदली करण्यात आली होती. त्या ठिकाणच्या कोविड रुग्णांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. तर बेंडाळे यांच्याकडे आरोग्य कार्यकारी अधिकारी या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. बेंडाळे हे सहायक आरोग्य अधिकारी पदाचे काम पाहून कार्यकारी अधिकारी पदाचेही काम पहात होते.

मात्र, अचानकपणे गत आठवड्यात गोफणे यांनी आपली पूर्वीच्या ठिकाणी बदली करावी, असा अर्ज करताच त्यावर तात्काळ कार्यवाही करत गोफणे यांना पूर्वीच्या नियुक्‍तीच्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. शहरात रोजच शेकडोच्या संख्येत करोनाचे रुग्ण वाढत आहेत, शहरातील रुग्णांच्या संख्येने सात हजारांची संख्या ओलांडली आहे, डॉक्‍टरांची कमतरता महापालिकेला भासत असताना ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याची इतक्‍या तत्परतेने बदली करण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दोनच दिवसांपूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्‍तांवर गंभीर आरोप केल्यानंतरही आयुक्‍तांची ही कृती पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

खरेदीतून अर्थकारण
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे बजेट मोठे आहे. त्यातच आता कोविडच्या नावाखाली आरोग्य आणि वैद्यकीय विभागाची मोठी उधळपट्टी सुरू आहे. आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्याची या खरेदीमध्ये महत्त्वाची भूमिका असते. डॉ. गोफणे हे याच ठिकाणी अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याने त्यांची खरेदीमध्ये महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अर्थकारणासाठी गोफणे यांना पूर्वीच्या जागी आणून स्वत:चे अर्थकारण आणखी मजबूत केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोविडपेक्षाही अर्थकारणालाच महापालिकेत महत्त्व असल्याचे या बदलीवरून स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.