Top 10 News : प्रभात हा महाराष्ट्रातील आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. चला, जाणून घेऊया आज, 12 एप्रिल 2026 रोजीच्या टॉप 10 महत्त्वाच्या राजकीय घडामोडी… १) बारामती-राहुरी पोटनिवडणूक : २३ एप्रिलला सार्वजनिक सुट्टी जाहीर बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत बारामती व राहुरी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीय. याबाबतची अधिकृत अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलीय. ही सुट्टी राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय संस्था तसेच सार्वजनिक उपक्रमांनाही लागू राहणार आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील जे मतदार कामानिमित्त बाहेर आहेत, त्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने शासनाने हे पाऊल उचलले असून नागरिकांनी मतदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेय. २) सरकारचा मोठा निर्णय; फ्लॅट मालकांसाठी ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ महाराष्ट्र शासनाने फ्लॅट मालकांसाठी ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या उपक्रमामुळे प्रत्येक सदनिकाधारकाचे नाव थेट जमिनीच्या नोंदींमध्ये समाविष्ट होणार असून, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेय. हे कार्ड पूर्णपणे डिजिटल आणि सुरक्षित असणार आहे. नव्या नियमांनुसार, केवळ जमिनीच नव्हे तर त्या जमिनीवरील प्रत्येक फ्लॅटची स्वतंत्र सरकारी नोंद केली जाणार आहे. या कार्डावर इमारतीचे क्षेत्रफळ आणि संबंधित फ्लॅटधारकाचा जमिनीतील हिस्सा स्पष्टपणे नमूद केला जाईल. यामुळे बहुमजली इमारतीतील मालकी हक्कांबाबतची गुंतागुंत कमी होणार आहे. या निर्णयामुळे मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांतील लाखो फ्लॅटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ३) अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; मोबाईल डेटा रिकव्हर नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश मिळालेय. एसआयटी आणि ED यांनी मोबाईलमधील डिलीट डेटा यशस्वीपणे रिकव्हर केलाय. यामध्ये चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि संपर्क क्रमांकांचा समावेश असून, या प्रकरणात मोठे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे. खरातवर विवाहित महिलांसह युवतींना जाळ्यात अडकवणे, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत. आतापर्यंत विविध कलमांखाली १५ गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ प्रकरणे महिलांशी संबंधित आहेत. दरम्यान, पोलीस हेल्पलाइनवर दररोज तक्रारी येत असून, २३ दिवसांत शेकडो कॉल्स नोंदवले गेले आहेत. ४० जणांची साक्षीदार म्हणून नोंद झाली आहे. मोबाईल डेटा मिळाल्याने पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जातेय. ४) साताऱ्यात जनावरांसाठी पहिलं ‘ब्युटी पार्लर’ सातारा जिल्ह्यातील माण्याची वाडी येथे पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिले अत्याधुनिक ‘ब्युटी पार्लर’ सुरू करण्यात आलेय. या ठिकाणी जनावरांसाठी शॉवर, स्वच्छता आणि केस काढण्याची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहे. याआधी ग्रामस्थ जनावरांना नदी-ओढ्यांमध्ये धुण्यास नेत होते, ज्यामुळे जलप्रदूषण होत होते. हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. विशेष म्हणजे, आंघोळीचे पाणी प्रक्रिया करून परसबागेसाठी वापरले जाते. घनकचरा आणि सांडपाण्याचेही योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. उन्हाळ्यात जनावरांमध्ये होणारे आजार टाळण्यासाठीही हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. ग्रामपंचायत आणि लोकवर्गणीतून उभा राहिलेला हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. ५) होर्मुज खाडी बंद; तेल-LPG पुरवठ्यावर जागतिक संकट इराणने होर्मुज खाडी अचानक बंद केल्याने जगभरात मोठी खळबळ उडालीय. अवघ्या २४ तासांत परिस्थिती बदलत तेल व LPG पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने कठोर इशारा देत नियम मोडणाऱ्या जहाजांवर कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, भारतीय जहाजावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली असून, खाडी परिसरात तणाव वाढला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी यापूर्वी खाडी खुली असल्याचे सांगितले होते, मात्र अचानक निर्णय बदलल्याने जागतिक बाजार हादरला. डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणच्या भूमिकेवर टीका केलीय. खाडी बंद राहिल्यास भारत, चीन, पाकिस्तानसह अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ६) मारुती सुझुकी इंडिया’च्या नेक्सा कार्सवर २.१५ लाखांपर्यंत सूट मारुती सुझुकी इंडिया’ने एप्रिल २०२६ मध्ये आपल्या नेक्सा श्रेणीतील कार्सवर मोठ्या सवलती जाहीर केल्यात. या ऑफर्समध्ये इग्निस, मारुती सुझुकी बलेनो, मारुती सुझुकी फ्रॉन्क्स, जिम्नी, ग्रँड विटारा, XL6 आणि इन्व्हिक्टो यांचा समावेश आहे. या सवलतींमध्ये ग्राहक ऑफर, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश आहे. बलेनोवर सुमारे ४० हजार, फ्रॉन्क्सवर ५५ हजार, ग्रँड विटारावर १.०७ लाख तर इन्व्हिक्टोवर तब्बल २.१५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या ऑफर्स महिन्याच्या अखेरपर्यंत लागू राहणार असून, व्हेरिएंटनुसार सवलती बदलू शकतात. याशिवाय कंपनी ‘अरेना’ मॉडेल्सवरही ४५ हजार रुपयांपर्यंत सवलत देत आहे. ७) लेन्सकार्टचा यू-टर्न; टिकली-टिळ्याला परवानगी लेन्सकार्टमध्ये टिकली-टिळा वादानंतर अखेर कंपनीने नवी नियमावली जाहीर केलीय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘स्टाईल गाईड’मुळे कंपनीवर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर संस्थापक पीयूष बन्सल यांनी स्पष्टीकरण देत जुनी पॉलिसी लागू नसल्याचे सांगितले. नव्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मोकळेपणाने परिधान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये टिकली, टिळा, सिंदूर, मंगळसूत्र, कडं, हिजाब, पगडी आणि पवित्र धागे यांचा समावेश आहे. कंपनीने स्पष्ट केले की, कर्मचाऱ्यांच्या श्रद्धांवर कोणतेही निर्बंध नसतील. तसेच ड्रेस कोडमध्ये टी-शर्टसोबत ब्लू जीन्स आणि सुरक्षा नियमांनुसार गडद रंगाचे बूट अनिवार्य ठेवण्यात आलेत. ८) दीपिका-रणवीर पुन्हा होणार आई-बाबा बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हे दोघे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने सोशल मीडियावर एक गोड फोटो शेअर करत आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केलीय. या फोटोमध्ये रणवीर मुलगी दुआला मांडीवर घेऊन बसलेला दिसतो, तर दुवाच्या हातात प्रेग्नन्सी टेस्ट किट दिसत आहे. या पोस्टनंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय. दीपिका आणि रणवीर यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. 8 सप्टेंबर 2024 रोजी त्यांनी मुलगी दुआचे स्वागत केले होते. आता लग्नाच्या आठ वर्षांनंतर ते त्यांच्या दुसऱ्या अपत्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेत. दरम्यान, रणवीर सिंग सध्या त्याच्या ‘धुरंधर 2’ चित्रपटामुळे चर्चेत असून, दीपिकाने प्रेग्नन्सीमुळे प्रमोशनपासून दूर राहिल्याचे स्पष्ट केलेय. ९) भर मैदानात फिरवलं लिंबू अन् चेन्नईचा खेळ खल्लास आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान एक अजब घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. एका व्हायरल व्हिडिओमध्ये हैदराबादचा एक चाहता हातात लिंबू घेऊन काहीतरी ‘जादू’ करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, त्याने हा तोडगा केल्यावर पुढच्याच चेंडूवर चेन्नईचा फलंदाज बाद झाला. हा योगायोग इतका अचूक होता की नेटकऱ्यांनी याला ‘काळी जादू’ आणि ‘लिंबू रिव्ह्यू सिस्टम’ असे नाव दिले आहे. @GemsOfCricket ने शेअर केलेल्या या व्हिडिओवर मीम्सचा पाऊस पडत असून, “चेन्नईच्या पराभवाचे खरे कारण हा लिंबूवाला फॅन आहे,” अशा मजेशीर कमेंट्स युजर्स करत आहेत. १०) अजित आगरकरांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत वाढवला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या कराराचे जून २०२७ पर्यंत नूतनीकरण केले आहे. आगरकर यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२४, २०२६ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अशी तीन आयसीसी विजेतेपदे मिळवून इतिहास रचलाय. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघनिवडीत सातत्य राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलाय. खेळाडूंचे योग्य नियोजन आणि धाडसी निर्णयामुळे आगरकरांच्या कामगिरीवर बीसीसीआय समाधानी असून, त्यांच्याकडे पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.