डॉ. कुमार विश्वास : जैन यूथ समिटतर्फे मोटिवेशनल स्पीच कार्यक्रम
बिबवेवाडी – प्रभू राम, कृष्ण किंवा भगवान महावीर यांच्या कथा प्रत्येकाने वाचायला हव्यात. त्यात आपल्याला जीवनाचे सूत्र समजेल. जीवन जगण्याची कला त्यात सापडेल. त्यांच्या कथांची तुलना आपण आपल्या आयुष्यातील जे ताणतणावाशी करून पाहा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मार्ग सापडला आहे, असे प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांनी अनेक उदाहरणांमधून उपस्थित श्रोत्यांना वेगळा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. निमित्त होते ते त्यांच्या विशेष व्याख्यानाचे.
सकल जैन संघाच्या वतीने वर्धमान सांस्कृतिक भवन, बिबवेवाडी येथे आचार्य प. पू. डॉ. शिवमुनीजी (म. सा.) यांचा चातुर्मास सुरू आहे. त्यात धार्मिक कार्यक्रमांसोबतच वेगवेगळ्या क्षेत्रांतील दिग्गज लोकांच्या व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमांतर्गत विश्वास यांचे व्याख्यान झाले. शिवायार्य समवशरण येथे स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारिवाल धर्मसभा मंडपामध्ये हा कार्यक्रम झाला. जैन यूथ समिटच्या वतीने आयोजित या “मोटिवेशनल स्पीच’च्या श्रृंखलेंतर्गत चौथे व्याख्यान हे डॉ. कुमार विश्वास यांचे झाले.
कुमार विश्वास यांनी भाषणाच्या सुरुवातीला आणि समारोपावेळीही कलम 370 च्या अनुषंगाने टिप्पणी केली. डॉ. विश्वास म्हणाले, देशाच्या 70 वर्षांच्या इतिहासात देश एका साहसिक परिवर्तनाच्या दिशेने निघालेला आहे. त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा! पण, तुमचा जो कोणी काश्मीरी मित्र असेल त्याला जवळ करण्याची, त्यांच्याबद्दल जिव्हाळा दाखवण्याची एक संधी आपल्यालाही आहे, ती वाया घालवू नका. त्यांच्या मनात एकोप्याचा विश्वास निर्माण करा, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. कुमार विश्वास यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
चातुर्मास समिती पूरग्रस्तांना करणार मदत
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसामुळे फारच भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चातुर्मास समितीच्या वतीने तेथील बंधुभगिनींसाठीही मोठी मदत पाठवली जाणार आहे. त्याची सुरुवात कालच्या कार्यक्रमामध्ये करण्यात आली. यामध्ये कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचे किटचा समावेश असणार आहे.