जामखेड -जामखेड- नगर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याबाबत सातत्याने दैनिक “प्रभात’ वृत्त प्रसिद्ध केल्याने यांची दाखल आमदार रोहित पवार यांनी घेतली असून त्यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्याने आता या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केंद्राने निधी उपलब्ध करू दिल्यास नागरीकांना दिलासा मिळणार असल्याचे आ. पवार यांनी स्पष्ट केले.
पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाचे खर्डा ते कुर्डूवाडी, श्रीगोंदा आणि जामखेड येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 ड,अहमदनगर- सोलापूर यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 516 अ या रस्त्यांच्याकामांसह जामखेड- नगर याच्या दुरुस्ती मागणी त्यांनी गडकरी यांच्याकडे केली आहे. गडकरी यांनी या रस्त्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.
मतदारसंघातून जाणारा पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाचे खर्डा ते कुर्डूवाडी यादरम्यान रखडलेले 114 कि.मीचे काम जलदगतीने सुरु करणे आवश्यक आहे. खर्डा गावापर्यंतच्या मार्गाचे काम आधीच प्रगतीपथावर आहे, मात्र खर्डा ते कुर्डुवाडीपर्यंतचा पुढील भाग अद्याप प्रलंबित आहे.
श्रीगोंदा आणि जामखेड येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 ड याचे पुनर्निर्माण आणि नुतनीकरण करण्यासंदर्भात आणि अहमदनगर – सोलापूर यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 516 अ या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. नगर ते जामखेड, बीड आणि दुर्गम भागातील गावे, जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 561 चे 51 किमी अंतराचे काम मागील वर्षी पूर्ण झाले आहे. मात्र साबळखेड-आष्टी-चिंचपूर – जामखेड येथून 20 किलोमीटरचा पॅच गेल्या 6 वर्षांपासून रखडला आहे.
मुसळधार पावसामुळे या मार्गाची अधिकच दुरवस्था झाली आहे. ज्यावर वाहने चालवणे अशक्य आहे. हा रस्ता मराठवाडा व अहमदनगरला जोडणारा अत्यंत महत्वाचा आहे. या रस्ता नुकताच राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीला निधी मिळाले कठीण झाले होते.
या रस्त्यांच्या प्रश्नासाठी दैनिक प्रभातने वेळोवेळी वाचा फोडून लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते अखेर आ.पवार यांनी दाखल घेऊन या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी गडकरी यांना साकडे घातले. या जामखेड- नगर रस्त्यांच्या या कामासाठी पुरेसा निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिल्याचे आ.पवार यांनी सांगितले.