हेअर डाय करताय? थांबा; आधी हे वाचा

केसांना रंग लावणं ही आजकाल फॅशन नाही तर हेअर स्टायिलगमधला अत्यावश्यक प्रकार मानला जातो. केस छोटे असोत वा मोठे, रंग लावून त्यांचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र केसांवर रंग लावण्याआधी त्या उत्पादनाची आणि त्यामुळे होणा-या परिणामांची पूर्ण माहिती करून घेणं आवश्यक आहे.

स्त्रीसौंदर्याचा मुकूट म्हणजे केस. म्हणूनच केसांना अलंकाराचा दर्जा दिला जातो. लांबसडक केस सौंदर्यात भरच टाकतात. अशा सौंदर्यात भर टाकणा-या केसांची निगा राखण्यासाठी अनेक महिला नाना प्रकारची औषधं, शॅम्पू, महागातली तेलं वापरत असतात. केसांची देखभाल करण्यासाठी महिला खूप धडपड करत असतात. त्यातीलच एक प्रकार आहे तो म्हणजे केसांना रंग लावून आकर्षक बनवण्याचा. आकर्षक दिसत असले तरीही केसांना रंग केल्यावर केसांची अवस्था कशी होईल याचा विचार करून कित्येक महिला हेअर कलर लावायला घाबरतात. केसांना रंग लावल्यानंतर केस रूक्ष होऊन तुटतात, खराब होतात असा समज असतो. म्हणूनच केसांना रंग करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या टिप्सचा विचार केलात तर तुम्ही बिनधास्तपणे केस रंगवू शकता.

रंगाची निवड करण्यापूर्वी तुमच्या केसांचा नैसर्गिक रंग, त्वचा यांचा विचार करूनच स्वत:ला शोभेल असाच रंग निवडा. सुरुवातीला केसांच्या दोन बटांनाच रंग लावा. एक बट हलक्या तर दुसरी गडद रंगात रंगवावी. त्यानंतर जो रंग योग्य वाटतो, तोच रंग संपूर्ण केसांना लावावा. सामान्य रंगाच्या त्वचेला मध्यम ब्राऊन, लाल व तपकिरी, सोनेरी रंग छान दिसतो, तर काळ्या किंवा सावळ्या त्वचेला तपकिरी, सोनेरी आणि गडद चॉकलेटी रंग खुलून दिसतात.

केसांना रंग लावल्यानंतर चेह-यावर हलकासा मेकअप करावा. म्हणजे रंगासोबत तुमचा चेहराही उजळेल. केस डॅमेज होण्याची किंवा तुटण्याची भीती वाटत असेल तर रंग लावण्यापूर्वी केस एकदा हेअर स्पेशालिस्टला दाखवून त्यांचा सल्ला आवर्जून घ्यावा. खरं म्हणजे केस तुटणे अथवा दुभंगणे याबाबत केसांना लावलेले रंग पूर्णत: दोषी नसतात. यूवी किरणांचा परिणाम केसांवर होऊन केस दुभंगण्याची भीती अधिक असते. रंग लावल्यानंतर केस धुतले, की ते सुकवण्यासाठी अधिक तापलेल्या हेअर ड्रायरचा वापर करू नये. त्यामुळे केस जळून खराब होण्याची भीतीच अधिक असते. रंग लावल्यानंतर नैसर्गिक पद्धतीने केस सुकवावेत, जेणेकरून केसांचा रंग सुंदर दिसेल.

निवडक शॅम्पू किंवा कंडिशनर लावल्याने केसांची दुर्दशा होणार नाही. सतत शॅम्पू बदलल्याने केसांवर परिणाम होतो. म्हणूनच नेहमी एकाच कंपनीचा शॅम्पू वापरा. केसांना रंग लावण्यापूर्वी अंडयाचा बलक केसांना लावून केसांची निगा ठेवू शकता. केस धुण्यापूर्वी केसांना अंडयाचा बलक लावून थोडा वेळ सुकू द्यावा. त्यानंतर केस धुवावेत. हा अंडयाचा बलक कंडीशनरप्रमाणे काम करून केसांना मुलायम करतो. यामुळे तुमच्या केसांचा रंग आणखी उठून दिसेलच शिवाय केसांना एक वेगळी चमक येईल. मुगाची डाळ वाटून तिची पेस्ट केसांना लावून केस धुतल्यास केस मुलायम होण्यास मदत होते.

रंगवलेल्या केसांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. केस मुळातच रफ असतील तर रंग लावल्यानंतर तुम्हाला त्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. मुख्य म्हणजे केसांचा यूवी किरण किंवा धुळीपासून बचाव करावा लागेल. केसांचा आणि भुवयांचा रंग एकमेकांपासून विरुद्ध असायला हवा. नैसर्गिक रंग लावणार असाल तर भुवयांचा आणि केसांचा रंग एकसमान होणार नाही याची काळजी घ्यावी. केसांच्या देखभालीसाठी केसांना नियमित तेल लावावे. आठवडयातून दोन वेळा केस धुवावेत.

उन्हापासून केस सुरक्षित ठेवावेत. हंगामी उन्हाळ्यापेक्षा सहज येणा-या उन्हातील हानिकारक यूवी किरणांमुळे आपले केस शुष्क होण्याची शक्यता असते, यासाठी केसांचं उन्हापासून संरक्षण केलं पाहिजे. ब्युटीशियन्सच्या सल्ल्याने रंगाची निवड करावी. रंगामध्ये असणा-या अमोनियामुळे केस खराब होतात हे तर आपल्याला माहीतच आहे. म्हणूनच अमोनियारहित रंगांकडे आकर्षित होत असाल तर त्याबाबत आणखी माहिती मिळवा. अमोनियारहित रंगावर विश्वास असेल तर आणखी काळजी घ्यावी. कारण अमोनियारहित रंगही अमोनियाप्रमाणेच केसांसाठी हानिकारक आहेत.

काही हेअर कलर उत्पादनांवर ‘नो अमोनिया’ किंवा ‘अमोनिया फ्री’ असं म्हटलं जातं. मात्र यामध्ये अमोनियाऐवजी अल्कायझर एमईएचा वापर केला जातो. सर्व स्थायी रंगांत अल्कायझरची आवश्यकता असते. जेणेकरून रंग केसांमध्ये जाऊ शकेल आणि त्यांना रंगवू शकेल. मात्र काही कंपन्या अमोनियारहित हेअर कलर सांगून त्यात अल्कायझर एमईएचा वापर करतात. स्थायी हेअर कलरप्रमाणेच रंग प्राप्त करण्याकरता एमईएमध्ये कधी कधी अमोनियाच्या तुलनेत उच्च केंद्रीकरणाचा वापर केला जातो. जो केसांसाठी हानिकारक असू शकतो.

एमईए हा अल्कायझरचा घटक डमी परमनंट कलरमध्ये वापरला जातो. या अल्कायझरच्या तुलनेत अमोनिया एवढा हानिकारक नाही. रंग करताना अमोनियाचा वास येत असल्याने आपल्याला तो हानिकारक आहे असं वाटतं. मात्र अमोनिया हा अत्यंत लहान अणू असून त्याचं त्वरित बाष्पीभवन होतं. म्हणूनच त्याचा उग्र वास येतो. तुलनेत एमईएचे अणू जड असतात. ते केसांवर जास्त काळ टिकून राहतात. त्यांना केसांवरून हटवणं कठीण असतं. केसांवर जे सतत प्रक्रिया करत असतात त्यांच्यासाठी असे रंग केसांना हानिकारक आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.