वॉशिंग्टन – गर्भकाळदरम्यान शिशूला करोना झाल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी याबाबत सांगितले की शिशूला करोना संसर्ग गर्भाशयातच झाला आहे. मातेची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नवजात शिशूला तत्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी बाळाची करोना चाचणी केली असता बाळ पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही करोनाची दोन लक्षणे नवजात शिशूमध्ये आढळून आली आहेत.
अमेरिकेतील टेक्सास येथे जन्म झालेल्या या बाळाची नाळी तपासली असता त्यावर करोना विषाणू आढळून आले. तसेच नाळी सुजलेली असल्याचेही डॉक्टरांच्या लक्षात आले. या दोन कारणांमुळे बाळाला करोना गर्भाशयातच झाला असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
इटलीतील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मागील आठवड्यातही एका गर्भात करोना विषाणू संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. करोना संक्रमणाच्या सुरुवातीपासूनच गर्भशयाला विषाणू संसर्ग होतो की नाही यावर परीक्षण सुरू आहे. शास्त्रज्ञांच्या मते, एचआयव्ही, झिका आणि अन्य विषाणू गर्भातील बाळाला संक्रमित करू शकतात. त्याप्रमाणे आता समोर आलेल्या घटनेमुळे हे सिद्ध झाले आहे की करोना विषाणूसुद्धा गर्भापर्यंत पोहोचू शकतो.
या करोनाबाधित शिशूवर रिसर्च करणाऱ्या टेक्सास युनिव्हर्सिटीच्या डॉ. अमांडा इव्हान्स यांनी याबाबत सांगितले की, आतापर्यंत अनेक करोनाबाधित मातांची प्रसूती झाली आहे. मात्र, बाळाला करोनाचा संसर्ग झालेला नाही. परंतु आता ही पहिलीच घटना समोर आली आहे, ज्यात बाळाला गर्भाशयातच करोनाचा संसर्ग झालेला आहे. या बाळाची पूर्ण वाढ होण्याअगोदरच म्हणजे तीन आठवडे अगोदरच जन्म झाला आहे.