जिनिव्हा – करोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत चीनमध्ये पुन्हा एकदा तपास केला जावा आणि तेथील प्रयोगशाळेचे नव्याने ऑडिट करण्यात यावे अशी मागणी जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
पुढच्या टप्प्याच्या तपासासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयसिस यांनी पाच मुद्यांचा प्राधान्यक्रम सुचवला आहे. त्यामध्ये चीनमध्ये 2019 च्या डिसेंबरमध्ये सर्वप्रथम ज्या भागात करोनाचे विषाणू आढळले होते, त्या भागातील प्रयोगशाळा आणि संशोधन संस्थांचे ऑडिट करण्यात यावे ही एक प्रमुख सूचना आहे.
चीनमध्ये करोना विषाणूच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी पुढचा टप्पा सुरू करण्यात यावा. त्यासाठी चीनमधील वुहान शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील पशू बाजारपेठेचीही तपासणी व्हायला हवी, असे घेब्रेययिस यांनी म्हटले आहे.
करोना विषाणूच्या उत्पत्तीबाबतचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांचे पथक 4 आठवडे बुहानमध्ये राहिले होते. तेथील संशोधन संस्था आणि प्रयोगशाळांची तपासणीही या पथकाने केली होती.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव वटवाघुळामुळे मानवाला झाला असावा, असा अंदाज या पथकाने चिनी तज्ञांबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला होता. मात्र अमेरिका आणि अन्य काही युरोपिय देशांनी चीनमध्ये अधिक विस्तृत तपासणी करण्याची मागणी केली होती.