बिजिंग: चीनमध्ये नियंत्रणात असलेल्या करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. विशेष म्हणजे, करोनामुक्त होऊन कित्येक महिने उलटल्यानंतरही दोन रुग्ण पुन्हा करोना पॉझिटिव्ह आढळल्याने चीनची चिंता वाढली आहे.
यापूर्वी करोनाची लागण झालेल्यांमध्ये करोना विषाणू जिवंत राहत असल्याची तसेच ते पुन्हा समोर येण्याची शक्यता वाढली असल्याने चीनला चिंता सतावत आहे.
चीनमधील हुबेई प्रांतात वास्तव्यास असणाऱ्या 68 वर्षीय महिलेला सर्वात आधी करोनाची लागण झाल्याचे समोर आले. सहा महिन्यांपूर्वी ती महिला करोनामुक्त झाली होती. यानंतर आता अजून एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीला एप्रिल महिन्यात परदेशातून परतल्यानंतर करोनाचा संसर्ग झाला होता.
या व्यक्तीला पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जवळच्या लोकांपैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळलेले नाही. मात्र त्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
करोनाने जगभरात थैमान घातले असताना लस शोधण्यासाठी अनेक देश यशस्वी प्रयत्न करत आहेत. मात्र अशा परिस्थितीत करोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा संसर्ग होत असल्याने चिंता वाढली आहे. करोना रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह सापडण्याचा प्रकार दुर्मिळ असून काही ठराविक रुग्णांनाच पुन्हा लागण होत असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. करोना विषाणूंचा सामना करण्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी पडत आहे का? असाही प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आहे.
काही अभ्यासांनुसार, करोनाशी लढा देताना निर्माण केलेली रोगप्रतिकारक शक्ती काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा कमी झाल्यावर संसर्ग होण्याची शक्यता बळावत आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा