नवी दिल्ली – देशात पेट्रोल-डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या दरात आता 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना 14 किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी 769 रुपये मोजावे लागणार आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाली होती. सिलेंडरची किंमत 694 रुपयांवरून 719 रुपये करण्यात आली होती.
एप्रिल 2020 मध्ये सिलिंडरचा दर 789.50 रुपयांवर पोहोचला होता. त्यावेळी सिलेंडर आठशे रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र डिसेंबरपासून गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.
तसेच नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे भावही गगनाला भिडले आहे. पेट्रोलच्या दरात 28 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली आहे.