नगर (प्रतिनिधी) – शहर सहकारी बँक कर्ज फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. नीलेश शेळके याच्या पोलीस कोठडीत शनिवारी पुन्हा वाढ झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले होते. त्यानुसार न्यायालयाने डॉ. शेळके याच्या पोलीस कोठडीत 7 जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.
नगरमधील शहर सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. शेळके याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. सुमारे दोन अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ. शेळके याला आर्थिक गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला अटक करण्यासाठी पुणे येथे गेलेल्या पोलीस पथकाला डॉ. शेळके सापडला होता.
सुरुवातीला रेखा जरे हत्याप्रकरणी डॉ. शेळकेकडे चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला 26 डिसेंबरला आर्थिक गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. डॉ. शेळके याला सुरुवातीला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. आता पुन्हा त्यात वाढ झाली असून, शेळकेचा कोठडीतील मुक्काम 7 जानेवारीपर्यंत वाढला आहे.