न्यूयॉर्क : अमेरिकेमध्ये उत्तर डेट्रॉईटमधील एका शाळेवर एका अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेत तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रशासनाने हा या वर्षातील सर्वात प्राणघातक हल्ला असल्याचे म्हटले आहे. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांना दुपारी १२:५५ च्या सुमारास उत्तर डेट्रॉईटच्या उपनगरातील ऑक्सफर्ड टाउनशिपमधील ऑक्सफर्ड हायस्कूलमध्ये एक बंदूकधारी व्यक्ती फिरत असल्याची माहिती देण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ऑकलंड काउंटी शेरीफ कार्यालयाने सांगितले की एका संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. शेरीफच्या कार्यालयाने सांगितले की या हल्ल्यात एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश नव्हता. गोळीबारात आठ जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
शेरीफच्या म्हणण्यानुसार, गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये एक विद्यार्थी १६ वर्षांचा, एक १४ वर्षांचा आणि एक १७ वर्षांचा आहे. त्याचबरोबर जखमींपैकी सहा जणांची प्रकृती आता स्थिर असून उर्वरित दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
ऑक्सफर्ड कम्युनिटी स्कूलचे अधीक्षक टिम थ्रोन म्हणाले की. त्यांना अद्याप पीडितांची नावे किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असल्याबाबत माहित नाही. मला धक्का बसला आहे. हे विनाशकारी आहे, असे अधीक्षकांनी पत्रकारांना सांगितले.