स्वच्छता ठेका साडेसहा कोटींचा नगरपालिकेच्या 40 गाड्यांपैकी सहाच घंटागाड्यांचे आरटीओकडून पासिंग
सातारा – सातारा शहराच्या स्वच्छता ठेकेदारांची मुदत पुन्हा 24 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. पालिकेच्या मालकीच्या घंटागाड्यांचे आरटीओ पासिंग रखडल्याने आपत्कालीन परिस्थिती ओढावली आहे. 40 पैकी फक्त सहाच घंटागाड्यांचे पासिंग झाले आहे.
साताऱ्यात 40 घंटागाड्यांच्याद्वारे शहराची स्वच्छता व्यवस्था बघणारे तीन ठेकेदार आहेत. या ठेकेदारांचा 23 फेब्रुवारी रोजी ठेका संपला होता. मात्र, पालिकेच्या घंटागाड्या तांत्रिक कारणामुळे रस्त्यावर उतरू शकत नसल्याने जुन्याच ठेकेदारांना 8 मार्चपर्यंत काम करण्याची गळ घालण्यात आली होती.
आता ती मुदत 24 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. आरोग्य विभागाची घंटागाडी खरेदीची जितकी घाई झाली तितक्या तातडीने त्या रस्त्यावर आणण्याची गडबड मात्र अजिबात जाणवतं नाही. घंटागाड्यांच्या विलंब सेवेचे पहिले तांत्रिक कारण म्हणजे या गाड्यांचे अद्याप आरटीओ पासिंग झालेले नाही.
एमआयडीसीतल्या एका शेडमध्ये या गाड्या तब्बल आठ महिन्यांपासून उभ्या आहेत. या गाडयांचे लवकरच पासिंग होणार, असा कंठशोष आरोग्य विभाग करत असला तरी प्रत्यक्षात पासिंगची प्रक्रियाच झालेली नव्हती. 40 पैकी केवळ सहागाड्यांचे पासिंग झाले असून अद्याप 34 गाड्या पासिंगशिवाय उभ्या आहेत.
घंटागाडीची सेवेला विलंब होण्याला राजकीय कारणसुद्धा आहे. घंटागाडी पाहयला जाण्याचा दोन वेळा बनवण्यात आलेला बेत रद्द झाला आहे. कधी उपनगराध्यक्ष, कधी मुख्याधिकारी, कधी नगराध्यक्ष अशी कोणाचीच लवकर सांगड बसत नसल्याने आरोग्य विभागाची अडचण झाली आहे. घंटागाडी खरेदी व प्रत्यक्ष सेवा या मुद्द्यांवर आघाडीत अंर्तगत मतभेद असल्याची कुणकुण आहे. मात्र, गाड्या पटकन रस्त्यावर याव्यात, यासाठी कोणता नगरसेवक रस्त्यावर यायला तयार नाही.
साताऱ्यात अडीच कोटींचा स्वच्छता ठेका आता साडेसहा कोटींचा झाला आहे. तो कसा झाला याची उत्तरेसुध्दा आरोग्य विभागाला द्यावी लागतील. गाडी पासिंग लेट झाल्याने “जीपीस’ सुविधा बसवणे, गाडी पेंट करणे आदी कामे लांबणीवर पडली आहेत. आरोग्य विभागाचा घंटागाड्यांच्या सेवेबाबत “होममार्क’ नसल्याने ही सेवा सातत्याने तोंडघशी पडत असून जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढ द्यावी लागत आहे.