सातारा (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शनिवारी फेरनिवड करण्यात आली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आगामी तीन वर्षांसाठी निवड करण्या -करिता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जनरल बॉडीची सभा झाली. यावेळी सचिवपदी नवी मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांची निवड करण्यात आली.
उच्च शिक्षण सहसचिवपदी येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांची, माध्यमिक शिक्षण सहसचिवपदी नगर येथील संजय नागपुरे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, जयश्री चौगुले, अरुण कडू-पाटील, पी. जे. पाटील, आमदार चेतन तुपे यांची निवड करण्यात आली आहे. मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांचीही निवड करण्यात आली.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड दर तीन वर्षांनी केली जाते. या निवडी आजवर कर्मवीर पुण्यतिथी दिवशी म्हणजेच नऊ मे रोजी केल्या जात. यंदा करोनामुळे या निवडी लांबणीवर पडल्या होत्या. सुरक्षित अंतराचे नियम पाळून झालेल्या सभेसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
शनिवारी निवडलेले मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य पुढीलप्रमाणे :
डॉ. अनिल पाटील, अँड. भगीरथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, रामशेठ ठाकूर, अँड. रवींद्र पवार, मीनाताई जगधने, डॉ. विश्वजित कदम, प्रभाकर देशमुख, दादाभाऊ कळमकर, बाबासाहेब भोस, मुमताजअली शेख, डॉ. यशवंत थोरात, रामचंद्र गायकवाड, कृष्णराव घाटगे, डॉ. भारत जाधव, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, चंद्रकांत वाव्हळ, डॉ. भाऊसाहेब कराळे, विलास महाडिक, प्रिं. डॉ. गणेश ठाकूर, अँन्थोनी अँलेक्स डिसोझा, तुकाराम कन्हेरकर, प्रा. डॉ. काळुराम कानडे.