अलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी शेतकऱ्यांना अधिक आर्थिक सक्षम करण्याचा निर्धार करण्यात आला. बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी शेतकर्यांना यांत्रिकीकरणाद्वारे अधिक सक्षम बनवण्याचा बँकेचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. फळ पिकांवर ड्रोनने फवारणी करण्यासाठी सरकारकडून सबसिडी मिळते.
या पार्श्वभूमीवर आरडीसीसी बँक मीनाक्षी ड्रोन योजना राबवणार आणि बँकेद्वारे सर्व शेतकर्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा जयंत पाटील यांनी यावेळी केली. यामुळे रायगडमधील शेतकरी आधुनिक होतील आणि त्यांचे उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शेतीला लागणारी जमीन कमी होत आहे. या परिस्थितीतही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी बँकेचे प्रयत्न आहेत. आंबा आणि काजू या पारंपरिक फळपिकांची लागवड प्रभावी करण्यासाठी बँक विविध योजना राबवणार आहे.
सध्या बँकेचा व्यवसाय 6 हजार कोटींवर असून तो 10 हजार कोटींवर नेण्याचा मानस चेअरमन जयंत पाटील यांनी व्यक्त केला. या आर्थिक वर्षात बँकेने 73 कोटींपेक्षा अधिक नफा मिळवला असून त्याचे श्रेय त्यांनी ग्राहकांनी दिले. यावेळी शेतकर्यांना अधिक सक्षम बनवण्याच्या दिशेने बँकेच्या धोरणांचा विस्तार कसा होईल, यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सभासदांना 12.5 टक्के डिव्हिडंड देण्याचे जाहीर करण्यात आले. य़ा वार्षिक सभेसाठी उपाध्यक्ष सुरेश खैरे, शंकरराव म्हात्रे, बँकेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, बँकेतील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.