पाटणा – बिहार मधील संयुक्त जनता दल या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रामचंद्र प्रसादसिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
रामचंद्र प्रसादसिंह हे पक्षाचे राज्यसभा सदस्य आहेत. पक्षाचे अध्यक्षपद आपल्या निकटवर्तीयाच्यावर सोडून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी थेट संबंध ठेवणे यानिमीत्ताने टाळले आहे असे सांगण्यात येते.
आता भाजपशी व्यवहार करण्याची सारी जबाबदारी नवीन अध्यक्षांवर राहील. भारतीय जनता पक्षाने संयुक्त जनता दलाचे अरूणाचल प्रदेशातील सात पैकी सहा आमदार फोडल्याने दोन्ही पक्षांत सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तशातच नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनेच संयुक्त जनता दलाच्या जागा कमी केल्या अशी धारणा त्या पक्षात झाली आहे.