मुंबई – रुपयाचे मूल्य संतुलित पातळीवर ठेवण्यासाठी आणि इतर बाबींचा विचार करून रिझर्व बँक चलन बाजारात हस्तक्षेप करीत असते. यासाठी रिझर्व बँकेकडून डॉलरच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. गेल्या दोन महिन्यापासून डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव निचांकी पातळीवर गेला आहे. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात रुपयाचे मूल्य सावरण्यासाठी रिझर्व बँकेने 9.28 अब्ज डॉलरची विक्री केल्याची आकडेवारी रिझर्व बँकेने जारी केलेल्या मासिक अहवालात नमूद करण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिन्यात रिझर्व बँकेने चलन बाजारात हस्तक्षेप करताना स्पॉट मार्केटमध्ये 27.5 अब्ज डॉलरची खरेदी केली तर 36.78 अब्ज डॉलरची विक्री केली. सप्टेंबर महिन्यात रिझर्व बँकेने 9.64 अब्ज डॉलरची खरेदी केली होती. रिझर्व बँक वेळोवेळी हस्तक्षेप करत असूनही 10 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर दरम्यान रुपयाचे 125 पैशांनी कोसळले. सध्या रुपयाचा भाव 85 रुपये 20 पैसे प्रति डॉलर या पातळीवर आहे. हा रुपयाच्या मूल्याचा निचांक आहे.
चीन आणि अमेरिकेतील गुंतवणूक भारतापेक्षा जास्त आकर्षक असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून विक्री करीत असतानाच रुपया घसरल्यामुळे या गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारातील विक्री आणखी वाढली असल्याचे सांगितले जाते. रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व बँकेकडून डॉलरची विक्री होत असल्यामुळे भारताकडील डॉलरचा साठा वेगाने कमी होत आहे.
सप्टेंबरच्या अखेरीस भारताकडे 704.9 अब्ज डॉलर होते. आता ही रक्कम कमी होऊन 652.87 अब्ज डॉलरवर आली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर ट्रम्प अमेरिकेचा डॉलर बळकट होईल अशा प्रकारच्या घोषणा करीत आहेत. त्यामुळे भारताच्या रुपयासह इतर चलनांचे मूल्य घसरत आहे. इतर देशाच्या चलनापेक्षा भारतीय रुपयाचे कमी अवमूल्यन झाले असल्याचे अर्थ मंत्रालयातील अधिकारी सांगत आहेत.