आरबीआयला दुसरा धक्का; डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उपगव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचा कार्यकाळ संपण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी शिल्लक होता. त्याआधीच राजीनामा दिल्याने आरबीआयला सात महिन्यांमध्ये बसलेला दुसरा धक्का आहे.

विरल आचार्य हे उर्जित पटेल यांच्या टीमचे महत्त्वाचे घटक होते. मात्र त्यांनीही पटेल यांच्या प्रमाणेच कार्यकाळ संपण्याआधी राजीनामा दिला. २३ जानेवारी २००७ रोजी आचार्य आरबीआयच्या सेवेत रुजू झाले. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा होता. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर सरकारनं शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी नियुक्ती केली. मात्र दास आणि विरल यांच्या मतांमध्ये बरंच अंतर होतं. नुकत्याच झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत वाढत्या महसुली तुटीवरुन आचार्य यांनी मांडलेली मतं दास यांच्यापेक्षा वेगळी होती.

दरम्यान,आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर पद सोडल्यानंतर विरल आचार्य आता न्यूयॉर्क विद्यापीठाच्या सेटर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणार आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.