नाशिक – नाशिक स्थित इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेडवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने निर्बंध घातले असून पैसे काढण्यावर मर्यादा घातल्या आहेत. याबाबत आरबीआयने एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात आरबीआयने असे नमुद केले आहे की, बॅंकेचे 99.88 टक्के ठेवीदार पूर्णपणे डिपॉझिट इन्शूरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या विम्याअंतर्गत येत आहेत.
बॅंकेतून पैसे काढण्यासाठी हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असणार आहेत. आरबीआयने असे म्हटले आहे की, ‘बॅंकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता ठेवीदारांना बचत किंवा चालू खात्यातून किंवा अन्य कोणत्याही खात्यातून जमा असणारी रक्कम काढण्याची परवानगी नसेल. ग्राहक जमा रकमेतून कर्जाची परतफेड काही अटीनुसार करू शकतात.
आरबीआयने बुधवारी कामकाजाची वेळ संपल्यानंतर आणखीही काही निर्बंध लादले आहेत. याअंतर्गंत बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरबीआयच्या मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज देऊ शकत नाहीत किंवा रिन्यू करू शकत नाहीत. कोणतीही गुंतवणूक किंवा पेमेंट देखील करता येणार नाही.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार बॅंक या निर्बंधासह त्यांचे बॅंकिंग व्यवसाय सुरू ठेवेल. ही परिस्थिती आर्थिक परिस्थितीत सुधार होईपर्यंत राहील. केंद्रीय बॅंक परिस्थितीनुसार या निर्देशांमध्ये सुधारणा करेल.