नवी दिल्ली : हैदराबादची महापालिका निवडणूक ही भाजपाने त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना प्रचारात आणत अतिशय प्रतिष्ठेची बनवली होती. दरम्यान, या निवडणुकांच्या निकालाचे कल हाती येत असून सुरवातीच्या कलानुसार भाजपाने ओवेसींच्या गडाला सुरूंग लावत मुसंडी मारल्याचे दिसत आहे.
सध्या हैदराबाद महानगरपालिकेच्या १३० जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. यामध्ये भाजपा सध्या ८५ जागांवर आघाडीवर आहेत. तस सत्तेत असलेली टीआरएस २९ जागांवर आणि ओवेसी यांचा एमआयम १७ जागांवर आघाडीवर असून तिसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तसेच अनेक दिग्गजांनी या ठिकाणी दौराही केला होता.
यापूर्वी २०१६ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपा युतीला केवळ ५ जागांवर विजय मिळाला होता. यापूर्वी सर्वच पक्षांनी या निवडणुकीत स्वत:ला झोकून दिल्याचे दिसले होते. दरम्यान, हाती आलेल्या कलांनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत हैदराबादमध्ये आपला विजय आहे, पुढची वेळ मुंबई महानगपालिकेची आहे, असे म्हटले.