RBI Repo Rate । आरबीआयने सर्वसामान्यांना आज मोठा दिलासा दिला आहे. मागच्या पाच वर्षांत पहिल्यांदाच आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने याआधीची व्याजदर कपात थेट मे २०२० मध्ये जाहीर केली होती. याशिवाय गेल्या दोन वर्षांत आरबीआयने व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते. आता मात्र आरबीआयकडून व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर करण्यात आल्यामुळे महागड्या EMI पासून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा करण्यात आली. याविषयी माहिती देताना नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी,”समितीने रेपो दर एक चतुर्थांश टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.” अशी माहिती दिली. आरबीआयचा रेपो दर ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्के केला जाईल.आरबीआयच्या या निर्णयानंतर बँकांना गृहकर्ज, कार कर्ज, शैक्षणिक कर्ज, कॉर्पोरेट कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मे २०२० च्या सुरुवातीला, कोरोना साथीमुळे, जेव्हा आरबीआयने व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. म्हणजेच ५ वर्षांनंतर, आरबीआयने व्याजदर कमी केले आहेत.
किती झाली व्याजदर कपात? RBI Repo Rate ।
रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय मोनेटरी पॉलिसी कमिटी अर्थात सीपीसीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आरबीआयने २५ बेसिस पॉइंटने व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे आता व्याजदर ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर आठवड्याभरातच आरबीआयनं व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केला आहे.
किरकोळ महागाई दर ४.२ टक्के राहील RBI Repo Rate ।
दरम्यान, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ४.२ टक्के महागाई दराचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आरबीआय गव्हर्नर यांनी याविषयी माहिती देताना, महागाई दरासाठी टोलरेंस बँड फिक्स केल्यापासून, सरासरी महागाई दर लक्ष्यानुसार आहे. किरकोळ महागाई दर बहुतेक वेळा कमी राहिला आहे. फक्त काही प्रसंगीच किरकोळ चलनवाढीचा दर आरबीआयच्या टोलरेंस बँडपेक्षा जास्त राहिला आहे.