RBI imposes penalty on HSBC Bank | आरबीआयकडून काही दिवसांपूर्वीच न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई करण्यात आली होती. आता मध्यवर्ती बँकेने आणखी दोन वित्तीय संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरबीआयने HSBC आणि IIFL समस्ता फायनान्स लिमिटेडवर दंडात्मक कारवाई केली आहे.
आरबीआयने हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेडला (HSBC) 66.6 लाख रुपये आणि IIFL समस्ता फायनान्स लिमिटेडला 33 लाख रुपयांपेक्षा अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा ग्राहकांवर परिणाम होणार नाही.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, केवायसी आणि जमा रक्कमेशी संबंधित व्याज दराच्या निर्देशांचे पालन न केल्याने HSBC ला दंड ठोठावला आहे. तर आयआयएफएल समस्ता फायनान्स लिमिटेडला केवायसी व इतर नियमांचे पालन न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आरबीआयने 31 मार्च 2023 पर्यंत HSBC च्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये कंपनीकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळले होते. त्यानंतर मध्यवर्ती बँकेने HSBC ला नोटीस जारी करत कारणे स्पष्ट करण्यास सांगितले होते. तपासादरम्यान, बँकेने अँटी-मनी लॉन्ड्रिंग अलर्टचे निराकरण करण्याचे काम समूहातील इतर कंपनीला दिल्याचे समोर आले आहे. काही असुरक्षित परकीय चलनाच्या जोखमीची माहिती बँकेकडून देण्यात आली नव्हती.
आरबीआयने HSBC प्रमाणेच IIFL समस्ता फायनान्स लिमिटेडवरही कारवाई केली आहे. कंपनीने आरबीआयच्या ‘फेअर कंडक्ट कोड’चे उल्लंघन करत कर्ज वितरणाच्या पूर्वी काही कर्जदारांकडून व्याज वसूल केले. तसेच, 90 दिवसांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या काही कर्जखात्यांना एनपीए म्हणून वर्गीकृत केले नव्हते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.