RBI Action: पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाची क्षमता नसल्याच्या कारणावरून भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्रातील फलटण येथील ‘द यशवंत को-ऑपरेटिव्ह बँके’चा (The Yashwant Co-operative Bank) परवाना रद्द केला आहे. मंगळवार, १९ मे रोजी कामकाज संपल्यानंतर हा आदेश तत्काळ लागू झाला. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बँकेने बँकिंग रेग्युलेशन कायद्यातील काही आवश्यक अटींचे पालन करण्यात अपयश आले आहे. सध्याच्या आर्थिक स्थितीत बँकेला ठेवीदारांची संपूर्ण रक्कम परत करणे शक्य नसल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले. याशिवाय, महाराष्ट्राच्या सहकार आयुक्त व निबंधक यांना बँकेचे विलीनीकरण/विघटन प्रक्रिया सुरू करून लिक्विडेटर नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बँकेच्या ठेवीदारांना ‘डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ (DICGC) मार्फत प्रत्येकी कमाल ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे ९९.०२ टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम परत मिळण्यास पात्रता आहे. २० एप्रिल २०२६ पर्यंत DICGC ने ठेवीदारांना एकूण १०६.९६ कोटी रुपयांची रक्कम अदा केल्याची माहितीही आरबीआयने दिली आहे.