कामगिरी खालावल्यानेच रायडूला वगळले

तत्कालीन निवड समितीचे स्पष्टीकरण

मुंबई – इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघात अंबाती रायडूला स्थान देण्यात आले नव्हते. त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. रायडूच्या कामगिरीवर आम्ही नजर ठेवून होतो. मात्र, त्याची कामगिरी सातत्याने खालावल्याचे स्पष्ट झाल्यामुळेच त्याला विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात स्थान देण्यात आले नव्हते, असे स्पष्टीकरण तत्कालीन निवडसमितीचे सदस्य गगन खोडा यांनी दिले आहे.

या स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले होते. या स्पर्धेसाठी संघ जाहीर केल्यापासूनच निवड समितीवर टीका सुरू झाली होती. भारतीय संघात चौथ्या क्रमांकाचा वाद सुरू असताना संघात ऋषभ पंत, अंबाती रायडूला वगळण्यात आले होते तर, अत्यंत नवखा असलेल्या विजय शंकरला संघात स्थान देण्यात आले होते.

विजय शंकरपेक्षा अंबाती रायडू जास्त अनुभवी असूनही त्याला संधी नाकारली गेली होती व त्यावरून निवड समितीवर प्रचंड टीका झाली होती. स्पर्धा इंग्लंडमध्ये असल्याने नवोदित खेळाडूला स्थान देण्यापेक्षा अनुभवी खेळाडूला संघात घेणे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे होते मात्र, रायडूची कामगिरी सातत्याने खालावत होती, त्यामुळेच त्याचा विचार झाला नाही, असेही खोडा यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.