रविशकुमार, एलिझाबेथ गिल्बर्ट जयपूर संमेलनाचे आकर्षण

जानेवारीतील संमेलनाच्या प्रतिनिधी नोंदणीला मोठा प्रतिसाद

जयपूर : येथील डिग्गी पॅलेसमध्ये प्रतिवर्षी होत असलेल्या जयपूर इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टीव्हलसाठी प्रतिनिधी नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत असून जानेवारी 23 ते 27 दरम्यान हे साहित्य संमेलन होणार आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार रविशकुमार, “इट-प्रे-लव्ह’ कादंबरीची लेखिका एलिझाबेथ गिल्बर्ट यांच्यासह मुघल इतिहासकार सुप्रिया गांधी आणि ख्यातनाम गायिका शुभा मुद्‌गल आणि संगीत दिग्दर्शक विशाल भारद्वाज अशा नामांकितांचा समावेश आहे. पुढील वर्ष हे या संमेलनाचे 13 वे वर्ष आहे.

नमिता गोखले, संजय रॉय आणि विल्यम डॅलरिम्पल हे या विख्यात संमेलनाचे संकल्पक आणि समन्वयक असून जगभरातील किमान 60 देशांतील सुमारे 250 हून अधिक साहित्यिक, बहुतांश भारतीय भाषांमधील प्रतिनिधी लेखक, तसेच राजकारण, पत्रकारिता, क्रीडा, सिनेसृष्टी आणि समाजकारण यामधील दिग्गजांची उपस्थिती या संमेलनाला असते.

यावर्षी व्यास सन्मान विजेती लेखिका चित्रा मुद्गल, साहित्य अकादमी विजेते विख्यात स्तंभलेखक केकी दारुवाला, सिलिब्रिटी शेफ अस्मा खान तसेच “मान बुकर’ पुरस्कार विजेते लेखक हॉवर्ड जेकब्सन अशा नामांकितांचा समावेश आहे.

यापूर्वी या संमेलनात दलाई लामा, अमर्त्य सेन, महाश्‍वेता देवी, यु आर अनंतमूर्ती, गुलज़ार, ऋषी कपूर, मनिषा कोईराला, शबाना आज़मी, जावेद अख्तर यांच्यासह अनेक देश-विदेशांतील नोबेल पारितोषिक विजेत्या साहित्यिकांनी उपस्थिती लावली आहे. वर्ष 2020 मध्येही आणखी नामांकितांना या संमेलनासाठी निमंत्रण देण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.