नवी दिल्ली -विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) अध्यक्षपदी शनिवारी डॉ. रवींद्र नारायण सिंह यांची निवड करण्यात आली. मूळचे बिहारचे रहिवासी असणारे सिंह निष्णात अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना 2010 मध्ये पद्मश्री या नागरी सन्मानाने गौरवण्यात आले.
विहिंपचे मावळते अध्यक्ष विष्णू सदाशिव कोकजे यांनी जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे 82 वर्षीय कोकजे यांच्या इच्छेचा मान ठेवत नव्या अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे विहिंपने स्पष्ट केले.
एप्रिल 2018 पासून कोकजे विहिंपच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. तर, सिंह यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. आता ते विहिंपचे नवे अध्यक्ष बनले आहेत. त्यांनी सामाजिक, धार्मिक आणि इतर क्षेत्रांतही मोठे योगदान दिले आहे.
विहिंपच्या दोन दिवसीय बैठकीत सिंह यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याशिवाय, विहिंपच्या महामंत्रिपदी मिलिंद परांडे यांची फेरनिवड करण्यात आली.