पुणे – कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसने देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली.
काँग्रेसने योग्य वेळी उमेदवारी जाहीर केली असल्याची भावना धंगेकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केल्या. महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीने लढून हा विजय निश्चित करेल. ही येणाऱ्या विधानसभेची नांदी आहे,कसब्यातून याची सुरुवात होत आहे. मंत्रालयात महाविकास आघाडीचा झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील धंगेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
१९९१ ची पुनरावृत्ती होणार
१९९१ ची पुनरावृत्ती होणार असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी यावेळी व्यक्त केला. १९९१ ला झालेल्या पोट निवडणुकीमध्ये काँग्रेसने ज्या प्रकारे विजय मिळवला त्याप्रकारे २०२३ च्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मिळवून दाखवेल असं काकडे यावेळी म्हणले. भाजपने देशात केलेला कारभार कसबा मतदारसंघाने देखील पाहिला आहे त्यामुळे महाविकास आघाडीला निवडणून येण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचे मत यावेळी काकडे यांनी व्यक्त केले.
उमेदवारी निश्चित झाल्यावर धंगेकरांनी यांनी केसरीवाड्यात जाऊन टिळक कुटुंबियांची भेट घेतली. आमदार मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनानंतर कसबा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुक जाहीर झालेली असताना भाजपने या निवडणुकीत टिळक घरात उमेदवारी दिलेली नाही अशात काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांनी शैलेश टिळक, कुणाल टिळक, रोहित टिळक यांची भेट घेतली आहे.