Ravindra Dhangekar On Hasan Mushrif : पुण्यातील पोर्श कार अपघाताचे पडसाद केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात पडल्याचे दिसून आले. अपघातानंतर घडलेल्या घटनांमुळे समाजात प्रशासनाविरोधात असंतोषाची लाट उसळली. दरम्यान, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील करण्यात आले. त्यातच पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने ससूनमधील 2 डॉक्टर काम करत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केला होता. बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यात आल्यानंतर ससूनमधील दोन डाॅक्टरांना अटक करण्यात आली आहे.
यानंतर धंगेकरांनी मुश्रीफांवर तोफ डागली होती. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी रवींद्र धंगेकर यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. मुश्रीफ यांच्या इशाऱ्यानंतर रवींद्र धंगेकर आज (शुक्रवार) पहिल्यांदाच कोल्हापुरात आले होते.
पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डाॕक्टरांना अटक करण्यात आली आहे.
ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत…
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 27, 2024
यावेळी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, “मी हसन मुश्रीफ यांची माफी मागतो. पण पुण्यातील पब संस्कृती बंद केली पाहिजे. पब बंद होणार नसतील तर मी कुणाची माफी मागणार नाही. मी कुणाला घाबरत नाही, नोटीस द्या नाहीतर आणखी काही करा’ अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली.
यावेळी धंगेकरांनी सत्ताधाऱ्यांना डिवचले. 4 तारखेनंतर मी विधानसभेत नसेन तर लोकसभेत असेन असा दावा त्यांनी केला. ललित पाटील प्रकरणी देखील मी हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे ते म्हणाले. सत्तेपायी वडिलांसारख्या शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी धमकी देऊ नये, असा इशारा त्यांनी दिला.