पुणे(प्रतिनिधी) – माहिती अधिकार कार्यकर्ता रवीद्र बऱ्हाटे याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष मोक्का न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी दिला आहे.
एक वर्षाहून अधिक काळ तो फरार होता. त्या कालावधीत ऑनलाईन खुरापती सुरूच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने कायद्याला सामोरे जाण्याचे टाळून फरार कालावधीत माध्यमांद्वारे स्वतःचे उदात्तीकरण करण्याबरोबरच तपासयंत्रणा, न्यायव्यवस्था, शासनव्यवस्था, साथीदार फिर्यादी यांच्यावर टीका टिप्पणी करून दबाबाखाली ठेवून खच्चीकरण करण करण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला.
तो ग्राह्य धरून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान यापूर्वी अटक झालेली रवींद्र बऱ्हाटेची पत्नी संगिता (वय.49,रा. धनकवडी) आणि वकील सुनील अशोक मोरे (49) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर, मुलगा मयूर याच्या पोलीस कोठडीत दोन दिवस वाढ करण्यात आली आहे.