पुणे -माहिती अधिकार कार्यकर्ता रवीद्र बऱ्हाटे याला विशेष मोक्का न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी दिला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एक वर्षाहून अधिक काळ तो फरार होता.
बऱ्हाटे याने कायद्याला सामोरे जाण्याचे टाळून फरार कालावधीत समाज माध्यमांद्वारे स्वतःचे उदात्तीकरण करण्याबरोबरच तपासयंत्रणा, न्यायव्यवस्था, शासनव्यवस्था, साथीदार आणि फिर्यादी यांच्यावर टीका टिप्पणी करून दबावाखाली ठेवून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला.
तो ग्राह्य धरून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणात सुमंत रंगनाथ देठे (58, रा. मांजरी बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्याद दिली होती. विशाल ढोरे, विनोद ढोरे, सुजित सिंग, अस्लम पठाण, बालाजी लाखाडे, बडतर्फ पोलीस शैलेंद्र जगताप, सचिन धिवार, विठ्ठल रेड्डी, परवेझ जमादार, स्वयंघोषित पत्रकार देवेद्र जैन, गणेश आमंदे, नितीन पवार, शंकर वसावे, संदीप घाडगे, सूरज गायकवाड, पितांबर धिवार यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत.
जून 2017 ते जून 2020 च्यादरम्यान मेगा सेंटर बिल्डिंग मगरपट्टा व फिर्यादीच्या मांजरी येथील जागेच्या व्यवहारातील फसवणूकप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा व नंतर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख करीत आहेत. दरम्यान, बचाव पक्षातर्फे ऍड. तुषार चव्हाण यांनी बाजू मांडली.
“नऊ फॉलोअर्स’ गुन्हे शाखेच्या रडारवर
पोलिसांकडून रवींद्र बऱ्हाटे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला लाईक करणे, प्रत्येक व्हिडिओ पाहणे, सातत्याने त्याचे फेसबुक पेज उघडणाऱ्यांची कुंडली तपासण्यात येत आहे. सोशल मीडियावर बऱ्हाटेला सातत्याने फॉलो केले जात होते. त्यानुसार गुन्हे शाखेकडून संबंधितांची माहिती गोळा केली जात आहे.
सॉफ्ट कॉर्नर दाखवणारेही रडारवर
बऱ्हाटेसंदर्भात काहीजण सॉफ्ट कॉर्नर दाखवत आहेत. त्याच्या कुटुंबाला अटक करून पोलिसांनी त्याच्यावर दबाव टाकत हजर होण्यास भाग पाडल्याचा प्रसार करत आहेत. त्याचे चाहते हा प्रकार नेमका कोणत्या उद्देशाने करत आहेत. त्यांचाही गुन्ह्यांमध्ये हात गुंतला आहे का? याचीही चाचपणी करण्यात येत आहे.
फेसबुकवर व्हिडीओ अपलोडसाठी घेतली मदत?
रवींद्र बऱ्हाटे याने फेसबुवकर 12 वेळा व्हिडीओ अपलोड केला आहे. मात्र, त्याला अपलोड आणि डाऊनलोड यातील फरक कळत नाही. हे करण्यासाठी त्याला मोबाइल, वायफाय इंटरनेटची सुविधा कोणी पुरवली. त्याने कोणत्या तांत्रिक उपकरणांचा वापर केला. त्याला ती कोणी उपलब्ध करून दिली. याचा व्हिडीओ चित्रीकरण केलेल्या ठिकाणाचा शोध घेऊन, तेथे जाऊन तपास करायचा आहे. या कालावधीत त्याला कोणी ई-मेल केले. याचा तपास करायचा असल्याचे सरकारी पक्षातर्फे न्यायालयात सांगण्यात आले.