Ravikant Tupkar । राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याचा आरोप रविकांत तुपकर यांच्यावर करण्यात आला. याच आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आलं. दरम्यान, संघटनेच्या या निर्णयानंतर रविकांत तुपकर यांनी एक ट्वीट केलं असून सध्या त्या ट्वीटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
“मी तुला आतून बाहेरून ओळखतो ” Ravikant Tupkar ।
रविकांत तुपकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रविकांत तुपकर पक्षनेतृत्त्वावर टीका करत असून आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि त्यांचा आता काहीही संबंध राहणार नसल्यचं संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्यावरील या कारवाईनंतर रविकांत तुपकर यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी,”संक्रमण होणार त्याची खूण ओळखतो, पावसाला अन् उन्हाला जून ओळखतो. माहिती आहे मला पुढची तुझी खेळी, मी तुला आतून बाहेरून ओळखतो…”, असे म्हटले आहे. त्याखाली त्यांनी त्यासोबतच त्यांनी सुरेश भट यांची विझलो जरी आज मी… या कवितेच्या ओळी पोस्ट केल्या आहेत. रविकांत तुपकर यांच्या सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
तुपकर सातत्यानं पक्ष विरोधी कृत्ये करताहेत Ravikant Tupkar ।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्त पालन समितीची बैठक सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत तुपकर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले की, “लोकसभा निवडणूक तुपकर यांनी पक्षाच्या वतीनं लढवणं अपेक्षित होतं, तरीही ते अपक्ष म्हणून लढले. तरीही स्वाभिमानीचा एक कार्यकर्ते म्हणून शेट्टी यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतरही तुपकर यांनी शेट्टी यांच्यावर टीका करणं सुरूच ठेवलं होतं. ते मागील तीन ऊस परिषदेसह अन्य कोणत्याही कार्यक्रमला उपस्थिती राहिलेले नाहीत. तुपकर सातत्यानं पक्ष विरोधी कृत्ये करत आहेत. राजू शेट्टी यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. त्यामुळे शिस्त पालन समितीसमोर उपस्थितीत राहून आपलं म्हणणं मांडण्याची नोटीस काढली होती. पण, ते शिस्त पालन समितीसमोर हजर राहिले नाहीत. त्यांनी परस्पर विधानसभेला विदर्भातील सहा जागा लढविण्याची घोषणादेखील केली.”, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना काबीज करण्याचा प्रयत्न
“आता ते स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पक्ष आणि संघटनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे. यापुढे तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही”, असं जालिंदर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.