विधानसभेच्या रणांगणात आता रवी लांडगे यांचीही उडी

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच लांडगे विरुद्ध लांडगे

कोणाची कोंडी होणार?

रवी लांडगे यांनी विधानसभेच्या मैदानात उडी घेतल्यामुळे कोणाची कोंडी होणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. रवी लांडगे यांच्यामुळे भोसरीतील मतांची फाटाफूट होणार हे निश्‍चित असून त्याचा फटका कोणाला बसणार यावर चर्चा रंगली असून पक्ष तिकीट कोणाला देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी – भोसरी विधानसभा मतदारसंघात आता भारतीय जनता पक्षातील स्पर्धा तीव्र झाली असून यापूर्वी आमदार महेश लांडगे आणि एकनाथ पवार यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा असतानाच कै. अंकुश लांडगे गटाचे रवी लांडगे यांनी विधानसभेच्या मैदानात दंड थोपटले आहेत. त्यामुळे पक्ष कोणाला तिकीट देणार आणि कोणाचा पत्ता कापणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून विधानसभा निवडणुकीपूर्वीच लांडगे विरुद्ध लांडगे लढत रंगली आहे.

विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आता अवघ्या दोन ते अडीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीनही मतदारसंघात शिवसेना आणि भाजपाकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र भोसरीतून महेश लांडगे आणि चिंचवडमधून लक्ष्मण जगताप हेच भाजपाचे उमेदवार असतील असे बोलले जात होते. मात्र चिंचवडमधील स्पर्धेनंतर आता भोसरीतीलही स्पर्धा तीव्र झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध विजयी झालेल्या रवी लांडगे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत जोरदार फ्लेक्‍सबाजी केली असून सर्वच फ्लेक्‍सवर भावी आमदार असा उल्लेख केल्यामुळे भोसरी मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच लांडगे विरुद्ध लांडगे लढत रंगणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेच्या भोसरी येथे रुग्णालयाच्या खासगीकरणाचा प्रखर विरोध करत रवी लांडगे यांनी यापूर्वीच आपणही मैदानात असल्याचा इशारा दिला होता. तसेच रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या विरोधाच्या निमित्ताने आमदार महेश लांडगे यांना एकप्रकारे आव्हान दिले असल्याचे त्याचवेळी बोलले जात होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील एकेकाळचे भाजपाचे निष्ठावंत आणि बडे प्रस्थ म्हणून कै. अंकुश लांडगे यांचा उल्लेख आजही होतो. शहरात भाजपाचे स्थान नगण्य असतानाही लांडगे यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये भाजपा मजबूत बनविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचेच पुतणे असलेल्या रवी लांडगे यांनी विधानसभेच्या मैदानात आता शड्डू ठोकल्याचे समोर आले आहे. त्यातच काही फलकांवर निष्ठावंत असा उल्लेख करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा देखील चर्चेचा विषय बनला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)