दुबई –विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी आयपीएल स्पर्धेतील अपयशावरून विराट कोहलीवर टीका करताना त्याची पत्नी अनुष्का शर्मालाही लक्ष्य केले होते. त्याचा समाचार घेताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गावसकरांवर पलटवार केला आहे. त्यांच्या जागी मी असतो तर कोहलीच्या पत्नीला उद्देशून काहीही बोललो नसतो, असेही शास्त्री यांनी अधोरेखीत केले.
आयपीएल स्पर्धेत कोहलीची कामगिरी सुरुवातीच्या काही सामन्यात सुमार होत होती. लॉकडाऊनमध्ये कोहलीने अनुष्काच्या गोलंदाजीवर फलेंदाजी करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याचाच आधार घेत गावसकर यांनी टीका केली होती.
अनुष्काने केलेल्या गोलंदाजीवरच कोहलीने सराव केला असल्याने त्याला आयपीएलमधील गोलंदाजांच्या गोलंदाजीवर धावा काढणे कठीण जात आहे, असे गावसकर म्हणाले होते व त्यामुळे खूप मोठा वाद निर्माण झाला होता. त्याबाबत बोलताना शास्त्री यांनी गावसकरांचे नाव न घेता टीका केली आहे. खेळाडूच्या कामगिरीवर बोलताना त्याच्या पत्नीला त्यात गोवणे योग्य नाही. मी त्यांच्या जागी असतो तर अनुष्काचे नाव घेतलेच नसते, असे सांगत शास्त्री यांनी या दोघांची पाठराखण केली आहे.
अन् म्हणे सूर्य म्हातारा झाला….
सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान का दिले गेले नाही या प्रश्नावर शास्त्री यांनी अत्यंत आश्चर्यकारक उत्तर दिले आहे. सूर्यकुमार 30 वर्षांचा असून संघात नवोदितांना संधी देण्याच्या निवड समितीच्या धोरणामुळे त्याला स्थान मिळू शकले नाही, असा जावईशोधही शास्त्री यांनी लावला आहे. संघात तरुण खेळाडूंना जास्त वाव दिला जात आहे, त्यासाठी भविष्यकालीन योजनाही तयार होत आहेत, असे असताना वयाची तीशी पार केलेल्या सूर्यकुमारला स्थान मिळणे कठीण आहे, असेही ते म्हणाले.